मुंबई APMC नंतर दापचरीत आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ, १,३९५ एकरांवर उभारणीचा संकल्प
रुईंगिस मार्केटच्या धर्तीवर अत्याधुनिक कृषी केंद्र १० हजार रोजगारांची निर्मिती — मंत्री जयकुमार रावल
पालघर : पालघर जिल्ह्यातील दापचरी येथे तब्बल १,३९५ एकर सरकारी जमिनीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची अत्याधुनिक कृषी बाजारपेठ उभारण्याचा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे. फ्रान्समधील प्रसिद्ध रुईंगिस (Rungis) मार्केटच्या धर्तीवर विकसित होणाऱ्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेशी थेट जोडण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पातून स्थानिकांसाठी सुमारे १० हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
प्रस्तावित आंतरराष्ट्रीय कृषी बाजाराच्या जागेची मंत्री रावल यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी त्यांनी १,३९५ एकर परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना प्रकल्पाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या. प्रकल्पातील गोशाळा परिसर, गोहर धाड कृषी विभाग, नवा मोहरा कृषी विभाग आदी भागांचीही त्यांनी पाहणी केली.
मुंबई-वाशीकडे जाण्याची शेतकऱ्यांची गरज संपणार?
दापचरी येथे बाजारपेठ उभारल्यानंतर पालघर परिसरातील शेतकरी आणि मच्छीमारांना आपला माल विक्रीसाठी मुंबई किंवा वाशी गाठण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्च कमी होऊन शेतमालाला चांगला दर मिळण्याची अपेक्षा आहे.
फळे, भाजीपाला, फुले, धान्य, कडधान्ये, मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि मांस यांसाठी बाजारपेठेसोबतच प्रक्रिया, पॅकिंग, कोल्ड स्टोरेज, गोदामे आणि निर्यात सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
‘मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स हब’ म्हणून विकास
वाढवण डीपवॉटर पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जवाहरलाल नेहरू बंदर, समृद्धी महामार्ग, वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर आणि वडोदरा एक्सप्रेस वे यांसारख्या पायाभूत सुविधांशी दापचरीला जोडण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कृषी मालाची वाहतूक आणि निर्यात अधिक वेगाने करता येणार असून लॉजिस्टिक खर्चातही बचत होईल.
फळे, भाजीपाला, फुले, धान्य, मसाले तसेच प्रक्रिया केलेल्या कृषी उत्पादनांच्या निर्यातीला या प्रकल्पातून मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
विस्थापन होणार नाही : रावल
“या प्रकल्पासाठी कोणाचेही विस्थापन केले जाणार नाही. अनेक वर्षांपासून पडून असलेल्या सरकारी जमिनीचा नियोजित विकास करून हा प्रकल्प उभारण्यात येईल. हा केवळ बाजारपेठ उभारण्याचा प्रकल्प नसून पालघरला आंतरराष्ट्रीय कृषी व्यापाराचे केंद्र बनविण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे,” असे मंत्री रावल यांनी स्पष्ट केले.
या प्रकल्पामुळे कृषी प्रक्रिया उद्योग, गोदामे, कोल्ड स्टोरेज, लॉजिस्टिक्स, पॅकिंग, वाहतूक आणि पूरक सेवांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून स्थानिक युवकांना रोजगारात प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना थेट जागतिक बाजारपेठेची दारे
दापचरीतील प्रस्तावित बाजारपेठ प्रत्यक्षात साकारल्यास मुंबई-नवी मुंबईनंतर पालघर हा कृषी व्यापाराचा नवा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील विविध भागांसह देशभरातील शेतमाल येथे आणून त्याची प्रक्रिया, साठवणूक आणि थेट निर्यात करण्याची व्यवस्था उभारण्याचा शासनाचा मानस आहे.
“सर्वांच्या सहकार्याने हा प्रकल्प लवकरात लवकर उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे,” असा विश्वास मंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केला.