Farmers Protest : संयुक्त किसान मोर्चा शेतकरी प्रश्नांवर राज्यात उभारणार प्रभावी संघर्ष
Farmer protest : महाराष्ट्रात संयुक्त किसान मोर्चा स्थापन करण्यासाठी सोमवारी (ता. २४) विविध शेतकरी संघटनांची बैठक मुंबई येथील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाली. दिल्लीच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात आणि महाराष्ट्रातील अभूतपूर्व शेतकरी संपात सहभागी असलेल्या बहुतेक संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार राज्यात संयुक्त किसान मोर्चा शेतकरी प्रश्नांवर प्रभावी संयुक्त संघर्ष उभारणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी दिली.
बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ३१ ऑगस्ट २०२३ रोजी संयुक्त किसान मोर्चाची स्थापना परिषद मुंबई येथे ३,००० प्रमुख शेतकरी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार आहे. त्यात सर्व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव, शेतकरी-शेतमजुरांची संपूर्ण कर्जमुक्ती व त्यांना किमान ५,००० रुपये दरमहा नियमित पेन्शन, नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी सर्वंकष पीक विमा योजना, अशा राष्ट्रीय प्रश्नांव्यतिरिक्त राज्यस्तरीय प्रश्नांवरसुद्धा संघर्षाचा ठराव केला जाणार आहे.
११ प्रमुख संघटनांची राज्यस्तरावरील समन्वय समिती निवडण्यात आली. राज्य परिषदेचा ठराव व मागण्या तयार करण्याची जबाबदारी प्रा. एस. व्ही. जाधव, प्रताप होगाडे, प्रतिभा शिंदे, डॉ. अजित नवले, राजन क्षीरसागर, उल्का महाजन, किशोर ढमाले, युवराज गटकळ, सुभाष काकुस्ते आणि सीमा कुलकर्णी यांच्या समितीला देण्यात आली.
या बैठकीत शेतकरी सभेचे आमदार जयंत पाटील, प्रा. एस. व्ही. जाधव, ॲड. राजेंद्र कोरडे व बोऱ्हाडे पाटील, अखिल भारतीय किसान सभेचे उमेश देशमुख, डॉ. उदय नारकर, किसन गुजर व डॉ. भाऊसाहेब झिरपे, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राजन क्षीरसागर, ॲड. बन्सी सातपुते व अशोक सोनारकर, लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, सर्वहारा जन आंदोलनाच्या उल्का महाजन,
जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे युवराज गटकळ, सत्यशोधक शेतकरी सभेचे किशोर ढमाले, महाराष्ट्र राज्य श्रमिक शेतकरी संघटनेचे विजय कुलकर्णी, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे प्रताप होगाडे व प्रभाकर नारकर, समाजवादी किसान सभेचे राहुल गायकवाड व अनिस अहमद, अखिल भारतीय शेतकरी शेतमजदूर संघटनेचे अनिल त्यागी, सगुणा संघटनेच्या शोभा करांडे व मनीषा पाटील आदी उपस्थित होते. आमदार जयंत पाटील यांनी या सभेचा समारोप केला.