गडचिरोलीत जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! विनापरवाना कीटकनाशक विक्री बंद – काळाबाजारांना कायमचा टाळा?

गडचिरोली : खते आणि कीटकनाशकांचा काळाबाजार करणाऱ्यांना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चपराक दिली आहे. शहरातील आरमोरी मार्गावरील तिरुपती कृषी केंद्रावर धाड टाकून विनापरवाना कीटकनाशक विक्री आढळल्याने संबंधित केंद्र बंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच महिन्याभरात खुलासा सादर करण्याची सक्त ताकीद देण्यात आली आहे.
मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यात काळाबाजार सुरू असल्याची तक्रारी येत होत्या. यावरून कृषी विभागाने अनेक कृषी केंद्रांना नोटिसा बजावल्या होत्या. तरीही काही केंद्रांवर बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळाली.
१६ सप्टेंबर रोजी उपविभागीय अधिकारी रणजीत यादव यांच्या उपस्थितीत धाड टाकण्यात आली. तपासात विनापरवाना विक्रीचा पुरावा मिळाल्याने केंद्रावर टाळे ठोकण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, पुढे अशा प्रकारची विक्री आढळल्यास संबंधित केंद्रांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करून थेट टाळे ठोकले जातील.
या कारवाईमुळे जिल्ह्यातील इतर कृषी केंद्रांचे धाबे दणाणले असून काळाबाजार करणाऱ्यांविरोधात प्रशासनाची भूमिका आक्रमक झाली आहे.