सोयाबीन उत्पादकांसाठी खुशखबर , सोयाबीनच्या हमीभावात चांगलीच वाढ
सोयाबीनला चांगला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मागच्या दोन वर्षांपासून निराश असल्याचं पाहायला मिळत आहे. आज केंद्र सरकारकडून चांगली बातमी जाहीर करण्यात आली असून सर्व पिकांच्या हमीभावात ६ ते १० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. देशात खरीप आणि रब्बी हंगामात पिकांचं मोठं   नुकसान झाल्यामुळे शेतकरी   हवालदिल झाल्याचे चित्र देशात पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणा देऊन अनेक ठिकाणी आंदोलनं केली आहे. निराश झालेला शेतकरी सध्या खरीप पेरणी करण्याच्या तयारीत आहे. अनेक ठिकाणी खरीप हंगामाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. परंतु काही शेतकरी अद्याप पावसाची वाट पाहत आहेत. आज केंदीय अर्थमंत्री पियुष गोयल   यांनी खरीप हंगाम २०२३-२०२४ साठी विविध पिकांचे हमीभाव जाहीर   केले आहेत. विशेष म्हणजे ही घोषणा करतांना त्यांनी २०१४-१५ च्या हमीभावाशी तुलना करून २०२४ निवडणूका ही डोळ्यासमोर ठेवल्या असल्याची सगळीकडं चर्चा आहे. २०२१ च्या हंगामात १० हजाराच्या पार गेलेल्या सोयाबीनला मागील दोन वर्षांपासून अत्यल्प दर मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
आज जाहीर झालेल्या हमीभावात केंद्र सरकारने मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल ३०० रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. २०२२-२०२३ च्या हंगामात सोयाबीनला ४३०० रुपये हमीभाव होता. जो यावर्षी ४६०० रुपये इतका असणार आहे. सरकारने याला मोठी वाढ म्हटले असले, तरी शेतकरी मात्र या बाबत समाधानी नाहीत. शेतकऱ्यांच्या मते उत्पातन खर्च हा यापेक्षा जास्त आहे. वाढलेला खर्च बघता सोयाबीनला किमान ६००० रुपये हमीभाव असणे गरजेचे होते, असे वाशिम जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.