द्राक्षाचे दर गगनाला, पण उत्पादन अर्ध्यावर! हवामानाच्या फटक्याने जालना तालुक्यातील बागायतदार अडचणीत
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा दुहेरी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. एकीकडे बाजारात द्राक्षांना विक्रमी दर मिळत असताना, दुसरीकडे अवेळी पाऊस आणि हवामान बदलामुळे उत्पादन निम्म्यावर आले आहे. परिणामी दर वाढूनही शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित नफा पडलेला नाही.
नंदापूर, कडवंची, वरूड, वखारी, धारकल्याण, पीरकल्याण, वाघरूळ या भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष बागा आहेत. विशेषतः ‘द्राक्षाचे आगार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कडवंची परिसरातील शेतकरी सातत्याने नवनवे प्रयोग करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र गेल्या सात-आठ वर्षांपासून कधी कोरोना, कधी दुष्काळ तर कधी हवामान बदल अशा संकटांनी शेतकऱ्यांची पाठ सोडलेली नाही.
तालुक्यात सुमारे ७५० हेक्टर क्षेत्रावर द्राक्ष बागा असून, सर्वाधिक क्षेत्र कडवंची–नंदापूर परिसरात आहे. यंदा अवेळी पावसामुळे रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला. बागा वाचवण्यासाठी औषध फवारणी, मजुरी आणि व्यवस्थापनावर मोठा खर्च करावा लागला.
कडवंची येथील शेतकरी सदाशिव क्षीरसागर यांनी सांगितले की, “खर्च प्रचंड वाढला, पण उत्पादन घटल्याने यंदाचा गोडवा कमी झाला आहे.”
तर सोपान क्षीरसागर यांच्या दीड एकर बागेत अपेक्षित ३५० क्विंटल ऐवजी केवळ १५० क्विंटल उत्पादन हाती आले.
दरांच्या बाबतीत मात्र यंदा विक्रम नोंदवला गेला आहे. साध्या द्राक्षाला ७८ रुपये, काळ्या द्राक्षाला १८१ रुपये, तर पांढऱ्या द्राक्षाला ९१ रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. गेल्या वर्षी ४५ ते ५० रुपये असलेला दर यंदा २० ते १०० रुपयांच्या घरात पोहोचला आहे.
नाशिक आणि सांगली भागात उत्पादन घटल्याचा फायदा जालना तालुक्यातील द्राक्षांना मिळत आहे. मध्य प्रदेश, नाशिक आणि बुलढाणा येथील व्यापाऱ्यांमध्ये द्राक्ष खरेदीसाठी मोठी स्पर्धा पाहायला मिळत असून, स्थानिक बाजारात १० किलोच्या कॅरेटला २०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे.
मात्र दर चांगला असला तरी उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांची एकूण आर्थिक स्थिती ‘जैसे थे’ असल्याचे चित्र आहे.
शेतकऱ्यांना झालेले फायदे :
• द्राक्षांना विक्रमी दर
• बाहेरच्या व्यापाऱ्यांची मोठी मागणी
• नाशिक–सांगलीतील उत्पादन घटल्याचा जालना तालुक्याला फायदा
• काही दर्जेदार द्राक्षांना उच्च भाव
शेतकऱ्यांचे नुकसान :
• अवेळी पावसामुळे उत्पादन निम्म्यावर
• रोगांचा प्रादुर्भाव, औषधांवर वाढलेला खर्च
• मजुरी, व्यवस्थापन खर्चात मोठी वाढ
• दर वाढूनही एकूण नफ्यात घट