हवामानाचा फटका! कोकणातील आंबा–काजू उत्पादकांना हेक्टरी ₹२२ हजार मदतीची घोषणा
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
हवामान बदलामुळे कोकणातील आंबा आणि काजू उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, ज्या शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतलेला नाही त्यांना हेक्टरी २२ हजार रुपये मदत देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता.२५) विधानसभेत केली.
अंतिम आठवडा प्रस्तावासह इतर प्रस्तावांवर उत्तर देताना त्यांनी आंबा, काजू तसेच धान उत्पादकांनाही बोनस देण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. यासंदर्भातील कार्यपद्धती निश्चित करण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
यंदा हवामान बदलामुळे आंबा आणि काजू पिकांना अपेक्षित फळधारणा झाली नाही. मोठ्या प्रमाणात फळगळती झाल्याने उत्पादकांचे नुकसान वाढले आहे. याबाबत दोन्ही सभागृहांमध्ये सदस्यांनी मदतीची मागणी केली होती. त्यानंतर यासंदर्भात बैठकही पार पडली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आंबा व काजू पिकांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल कृषी विभाग आणि बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून मागविण्यात आला आहे. कोकणातील पालघर, रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आंबा पिकाखाली १,२४,५७१ हेक्टर तर काजू पिकाखाली १,७५,१४० हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १५,७६९ शेतकऱ्यांनी फळपीक विमा घेतला आहे.
ज्या शेतकऱ्यांनी विमा घेतलेला नाही, मात्र नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत देण्याची सरकारची भूमिका आहे. यासाठी तातडीने पंचनामे करून नुकसानीचा आढावा घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकसानीचा अंतिम तपशील आल्यानंतर मदत जाहीर केली जाईल. मागील वर्षी १५ हजार रुपये मदत देण्यात आली होती, तर यंदा ती वाढवून हेक्टरी २२ हजार रुपये करण्यात येणार आहे.
दरम्यान, धान उत्पादकांनाही अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच कांदा उत्पादकांसाठी तात्काळ आणि दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
साखर उद्योगालाही दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. एफआरपी दर वाढले असले तरी एमएसपी वाढलेली नसल्याने निर्माण झालेल्या अडचणींचा विचार करून राज्यस्तरावर मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.