लातूर APMC मध्ये तुरीला तेजीचे संकेत;मार्च २०२६ मध्ये दर ८ हजारांच्या उंबरठ्यावर?
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी तुरीच्या दरात वाढ होण्यास सुरुवात झाली असून बाजारात तेजीचे संकेत दिसत आहेत. विशेषतः लातूर बाजारपेठेत तुरीचे दर किमान आधारभूत किंमतीच्या (MSP) दिशेने सरकत असल्याचे चित्र आहे.
मागील तीन वर्षांतील मार्च महिन्यातील सरासरी दर (प्रति क्विंटल)
• मार्च २०२३ : ₹८,२०४
• मार्च २०२४ : ₹७,११२
• मार्च २०२५ : ₹७,३१४
मार्च २०२६ मधील संभाव्य दर
‘बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा’ (मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन – SMART प्रकल्प) यांच्या अभ्यासानुसार,
मार्च २०२६ मध्ये तुरीचे दर ₹७,६९० ते ₹८,३४५ प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.
खरीप हंगाम २०२५-२६ साठी केंद्र सरकारने जाहीर केलेली MSP ₹८,००० प्रति क्विंटल असून सध्याचे बाजारभाव त्या दिशेने जाताना दिसत आहेत.
उत्पादन व आयात-निर्यात स्थिती
• वर्ष २०२४-२५ मध्ये तुरीच्या आयातीत वाढ झाली असून निर्यातीत घट झाली आहे.
• भारत सरकारच्या प्रथम अग्रीम उत्पादन अंदाजानुसार सन २०२५-२६ मध्ये तुरीचे उत्पादन सुमारे ३५.९७ लाख टन होण्याची शक्यता आहे.
• त्यापैकी महाराष्ट्रातील उत्पादन १३.३ लाख टन इतके अपेक्षित आहे.
तूर हे खरीप पीक असून पेरणी जून-जुलै, तर काढणी डिसेंबर-फेब्रुवारी दरम्यान केली जाते. जानेवारी ते एप्रिल हा तुरीचा प्रमुख विक्री हंगाम मानला जातो.
आवकेत घट, दरात तेजी
फेब्रुवारी २०२६ मधील तुरीची आवक मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाली आहे. आवक घटल्याने आणि बाजारात मागणी टिकून असल्याने दरात वाढ होण्यास पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
एकूणच, मार्च २०२६ मध्ये तुरीचे दर ८ हजार रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक वातावरण तयार होत असल्याचे चित्र आहे.