शेतकरी आत्महत्या करत असताना कृषी मंत्री मात्र जुगार खेळतात, सरकारची हीच का शेतकऱ्यांवरील जबाबदारी?

मुंबई ,एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : राज्यातील शेतकरी आज अनेक गंभीर संकटात सापडले आहेत. बोगस बियाण्यांची समस्या, हवामानातील सतत बदल, सिंचनाच्या सुविधेचा अभाव, दुबार पेरणीचे ओझे आणि वेळेवर मिळत नसलेले पीक विमा यामुळे त्यांचे जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झाले आहे. त्यातच बाजार समित्यांमध्ये हमीभावाचा अभाव, अडत्यांकडून होणारी फसवणूक आणि शासनाकडून वेळेवर मदत न मिळाल्यामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग पत्करत आहेत.
अशा भीषण आणि असंवेदनशील काळात, राज्याचे कृषी मंत्री माणिकराव ठाकरे यांनी “जुगार” खेळल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या या वादग्रस्त कृतीने संपूर्ण राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कृषीमंत्र्यांनी ही कृती वैफल्यातून केली असल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी ती मुळातच शासनाच्या अपयशाची एक अप्रत्यक्ष कबुली ठरते.
“आमचं आयुष्य उदध्वस्त झालंय, आणि हे मंत्री जुगार खेळताहेत?” – शेतकरी संघटनांचा संतप्त सवाल
राज्यभरातील अनेक शेतकरी संघटनांनी ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनेचा अपमान असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. “शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करण्याऐवजी जुगारासारखी कृत्यं करत असाल तर हे सरकार शेतकऱ्यांशी प्रामाणिक नाही,” अशी घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.
“सरकार गप्प, मंत्री बिनधास्त!”
या वादग्रस्त प्रकारानंतरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सरकार कृषी मंत्र्यांच्या पाठीशी का उभं आहे? हे प्रश्न उभे राहत आहेत. विरोधी पक्षनेते देखील या मुद्द्यावर आक्रमक होत असून, राज्यात ठिकठिकाणी कृषी मंत्र्यांच्या विरोधात निदर्शने केली जात आहेत.
“शेतकऱ्यांची ही अवस्था ‘भविष्याची नाही, तर वर्तमानाची’ आपत्ती आहे. कृषीमंत्र्यांनी त्वरित भूमिका मांडावी आणि जर ते वैफल्यातून असं वागत असतील, तर अशा अवस्थेत मंत्रिपद भूषवण्याचा नैतिक अधिकार त्यांच्याकडे उरत नाही.”