हमीभाव खरेदीसाठी राज्यात ९५० हून अधिक केंद्रे, १५.२८ लाख टन साठवण क्षमतेचे नियोजन!-जयकुमार रावल
सोयाबीन, तूर, उडदाच्या हमीभावात वाढ खरेदी केंद्रांवर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश
मुंबई : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी सुरळीत व्हावी, यासाठी राज्यात ९५० हून अधिक खरेदी केंद्रे सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. खरेदी केलेल्या शेतमालाच्या साठवणुकीसाठी १५.२८ लाख मेट्रिक टन क्षमतेची व्यवस्था उपलब्ध करण्याचे नियोजन असून, प्रत्येक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश पणन मंत्री जयकुमार रावल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
मुंबई येथे खरीप हंगाम २०२६-२७ मधील हमीभाव खरेदीच्या पूर्वनियोजनासाठी आयोजित बैठकीत पणन मंत्री जयकुमार रावल यांनी हे निर्देश दिले. केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेंतर्गत सोयाबीन, मूग, उडीद आणि तूर या पिकांची खरेदी करण्यात येणार आहे. खरेदी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासोबतच खरेदी केलेल्या शेतमालाच्या साठवणुकीचे काटेकोर नियोजन करण्याच्या सूचनाही रावल यांनी यावेळी दिल्या.
सोयाबीन, तूर, उडदाच्या हमीभावात वाढ
यंदाच्या हंगामात सोयाबीन, तूर आणि उडदाच्या हमीभावात वाढ करण्यात आली आहे. सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल ३८० रुपयांची वाढ होऊन दर ५,७०८ रुपये झाला आहे. तुरीच्या हमीभावात ४५० रुपयांची वाढ होऊन दर ८,४५० रुपये, तर उडदाच्या हमीभावात ४०० रुपयांची वाढ होऊन दर ८,२०० रुपये प्रतिक्विंटल झाला आहे.
बारदाना, वाहतूक आणि गोदामांची व्यवस्था वेळेत पूर्ण करा
राज्यातील प्रत्येक खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांसाठी बैठक व्यवस्था, पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच शेतमाल खरेदीसाठी आवश्यक बारदाना, वाहतूक व्यवस्था आणि गोदामांची तयारी वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश रावल यांनी दिले. हमीभाव खरेदी योजनेची माहिती अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करण्यावरही त्यांनी भर दिला.
शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा, त्यांच्या शेतमालाची हमीभावाने खरेदी विनाअडथळा व्हावी आणि खरेदी केंद्रांवर कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे रावल यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला पणन मंत्री जयकुमार रावल, पणन सचिव प्रवीण दराडे, पणन संचालक संजय कदम यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.