माळरानातून थेट युरोपात! मराठवाड्याच्या द्राक्षांनी गाठली सातासमुद्रापारची वाट
-काटी मंडळातील ४७५ द्राक्ष उत्पादकांची ‘कृषी’कडे अधिकृत नोंदणी माळरान बनले ‘ग्रेप्स पट्टा’
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क: 
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी आणि काटी मंडळ परिसरातील माळरानावर कष्टाने पिकवलेली द्राक्षे आता थेट सातासमुद्रापार जाण्यास सज्ज झाली आहेत. काटी मंडळ कृषी कार्यालयांतर्गत येणाऱ्या २३ गावांमधील तब्बल ४७५ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी परदेशी निर्यातीसाठी कृषी विभागाकडे अधिकृत नोंदणी पूर्ण केली आहे.
बांधावरच प्रमाणपत्रांचे वाटप
नोंदणीकृत शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत थेट शेतात जाऊन ‘रजिस्ट्रेशन’ प्रमाणपत्रे दिली जात आहेत. यामुळे द्राक्ष निर्यातीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा झाला असून शेतकऱ्यांचा वेळ आणि त्रास दोन्ही वाचले आहेत.
माळरानातून ‘ग्रेप्स पट्टा’
एकेकाळी गहू, ज्वारी आणि उसाचे पीक घेणारा हा परिसर आता हळूहळू ‘ग्रेप्स पट्टा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. काटी मंडळात सध्या ११०० ते १२३० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षाची लागवड झाली आहे.
पाणीसाठ्याच्या जोरावर दुष्काळी भागाचे रूपांतर
तामलवाडी, माळुंब्रा, सांगवी, सावरगाव, मसला खुर्द, जळकोटवाडी आणि पिंपळा बु. या गावांनी पाणी साठवण तलावांच्या बळावर दुष्काळी माळरानाचे नंदनवन केले आहे. दर्जेदार उत्पादनामुळे येथील द्राक्षांना जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे.
अतिवृष्टीचा फटका उत्पादनात घट
यंदा परतीच्या आणि अतिवृष्टीच्या पावसामुळे द्राक्ष बागांना मोठा फटका बसला आहे.
ऑक्टोबरमधील छाटणीनंतर अनेक बागांमध्ये गर्भधारणा न झाल्याने उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांची घट झाली आहे.
भावाचा आधार कायम
उत्पादन घटले असले तरी बाजारपेठेत द्राक्षांना चांगला दर मिळेल, असा विश्वास उपकृषी अधिकारी आनंद पाटील यांनी व्यक्त केला आहे.
“एकरी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. मात्र सध्या १०० रुपये किलो दर मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.”
— डॉ. निखिल वडणे, द्राक्ष सल्लागार
निर्यातीसाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण
परदेशात द्राक्षे पाठवण्यापूर्वी प्रयोगशाळा तपासणी, अहवाल आणि कृषी विभागाचा परवाना आवश्यक असतो.
ही संपूर्ण प्रक्रिया कृषी सहायकांमार्फत पूर्ण केली जात आहे, अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी विठ्ठल नागटिळक यांनी दिली.
शेतकऱ्यांना थेट परकीय चलनाची संधी
कृषी विभागाच्या अधिकृत नोंदणीमुळे मध्यस्थांची साखळी तुटणार असून शेतकऱ्यांना थेट परकीय चलन मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे मराठवाड्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण आहे.