‘कर्जफेड झाली’ म्हणत सही, पण जमीनच घेऊन विक्री! शेतकऱ्याची ६ कोटींची फसवणूक; पतसंस्थेवर गुन्हा,नेमकं काय घडलं?
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील कोकणगाव येथील शेतकऱ्याची कर्जमुक्तीची आशा चिरडत समता नागरी पतसंस्थेने कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वसंत मधुकर घोडके यांनी दिवंगत भावासह घेतलेल्या कर्जाची ‘सही घेऊन फेड झाली’ अशी खात्री दिल्यानंतरही संस्थेने तारणातील जमीन विकल्याचे समोर आले आहे.
घोडके बंधूंनी गट क्रमांक ५३१ आणि ५३२ या जमिनी तारण ठेवून सुमारे ६ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जफेडीचा विलंब झाल्यावर पतसंस्थेने कलम १०१ अन्वये वसुली दाखले काढले. त्यानंतर घोडके यांनी जवळपास ३.५ कोटी रुपये भरून खाते नियमित केले, अशी नोंद असूनही संस्थेने जुन्या दंडकारवाईचे आदेश मागे घेतले नाहीत.
पाठपुरावा करूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संस्थेवरील विश्वास ढासळत गेला. अखेर २०२० मध्ये संस्थेने तारणातील कोकणगावची जमीन थेट विक्रीस काढून ५.०५ कोटींना त्रयस्थ इसम – किशोर मनचंदा आणि दीपक मनचंदा – यांच्याकडे विकली.
फसवणुकीची ही धक्कादायक बाब समोर येताच संस्थेचे चेअरमन आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.