आता पणन मंत्री असतील मॅग्नेट प्रकल्पाचे पदसिद्ध अध्यक्ष; मंत्री मंडळ बैठकीत निर्णय

पणन मंत्री जयकुमार रावल हे महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे पदसिद्ध अध्यक्ष
प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री
मुंबई :   यापुढे आशियाई विकास बँक सहायित महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे पदसिद्ध अध्यक्ष पणन मंत्री असतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.या निर्णयामुळे राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हे ॲग्री बिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. तसेच प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्य सचिवांऐवजी मुख्यमंत्री असतील असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.  
प्रमुख १५ फलोत्पादन पिकांच्या मुल्यसाखळ्या विकसित करण्यासाठी मॅग्नेट प्रकल्प राबविण्यात येत आहे. राज्यातील सर्व जिल्हयांमध्ये ६ वर्षासाठी (सन २०२० ते २०२६ पर्यंत) हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. मॅग्नेट (MAGNET) प्रकल्पाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राला सक्षम करणे, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, आणि कृषी उत्पादनांची मूल्यसाखळी विकसित करणे आहे.या पूर्वी   प्रकल्पाचे अध्यक्ष म्हणून प्रधान सचिव पणन हे काम पाहत होते.या निर्णयामुळे आता राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल हे मॅग्नेट प्रकल्पाचे पदसिद्ध अध्यक्ष असतील.या प्रकल्पाच्या संनियंत्रणासाठी असलेल्या सुकाणू समितीच्या रचनेतही बदलास मान्यता देण्यात आली. त्यानुसार सुकाणू समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतील तर, उपाध्यक्षपदी पणन मंत्री व मुख्य सचिव हे सदस्य असतील.
या मुळे मॅग्नेट प्रकल्पाच्या माध्यमातून गतीने धोरणात्मक निर्णय होवून कृषी विपणन आणि कृषी संबधित व्यवसाय व्यवस्थापन मजबूत होईल. कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच अन्य बाबतीत सरकारचा हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आहे.   या अर्थसंकल्पात मॅग्नेट 2.0 साठी मोठी तरतूद करण्यात आली आहे.या निर्णयामुळे प्रकल्पाचा कारभार अधिक लोकाभिमुख होणार आहे.
हा महाराष्ट्र राज्य सरकारचा एक महत्त्वाचा प्रकल्प असून या प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी संबंधित व्यवसाय विकास, व्यवस्थापन,   प्रक्रिया, विपणन, अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा निर्मिती आणि व्यवस्थापन या संदर्भात आता वेगाने काम होईल.