कांदा उत्पादकांना दिलासा! निर्यात अनुदान दुप्पट करण्याची राज्याची मागणी

– मुख्यमंत्री फडणवीस यांचा केंद्र सरकारकडे प्रस्ताव, पणन मंत्री रावल यांची माहिती
मुंबई: राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाचा फायदा व्हावा यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात अनुदान दुप्पट करावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली.
मंत्रालयात कांदा भावस्थितीवरील बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, कृषी मूल्य आयोग अध्यक्ष पाशा पटेल यांच्यासह नाफेड व एनसीसीएफ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री रावल म्हणाले, “राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. कांदा उत्पादन 55 लाख मेट्रिक टनांवर पोहोचले असून निर्यातीला प्रोत्साहन देणे अत्यावश्यक आहे. अनुदान दुप्पट केल्यास विविध देशांत निर्यात वाढून शेतकऱ्यांना थेट फायदा होईल.”
कांद्याचे भाव पाडण्यासाठी अफवा पसरवणाऱ्या व नफेखोरी करणाऱ्या घटकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली दक्षता समित्यांमार्फत कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, राज्यभरातील 28 एपीएमसी सभापती व सचिवांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत रावल यांनी शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा यासाठी स्थानिक पातळीवर कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
भविष्यात शेतकरी उत्पादक गट व महिला बचत गटांच्या माध्यमातून “सोलर बेस कांदा निर्जलीकरण प्रकल्प” राबवला जाणार असून त्यातून कांदा पावडर व ओनियन चिप्स तयार करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्री केली जाणार आहे, अशी माहितीही रावल यांनी दिली.