Onion Price: कांद्याच्या दरांना उभारी; दोन दिवसांत किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार
नवी मुंबई : कांद्याच्या दरात गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने वाढ होत असून घाऊक बाजारात किलोमागे 10 ते 15 रुपयांची वाढ नोंदवली जात आहे. बांगलादेशने वाढवलेली आयात, श्रीलंका तसेच दक्षिण भारतातून वाढलेली मागणी, जुन्या कांद्याचा साठा संपत येणे आणि नवीन कांद्याच्या उत्पादनात घट या कारणांमुळे कांद्याच्या भावात तेजी आली असून याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
मुंबई एपीएमसी कांदा-बटाटा घाऊक बाजारात दोन दिवसांपूर्वी कांद्याला 10 ते 15 रुपये किलो दर मिळत होता. मात्र शनिवारी (दि. 14) हाच कांदा 15 ते 28 रुपये किलो दराने विकला गेला. अवघ्या दोन दिवसांत घाऊक बाजारात कांद्याच्या दरात 8 ते 10 रुपयांची वाढ झाली आहे.
एप्रिल महिन्यापासून बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक असल्याने भाव घसरले होते आणि शेतकरी अडचणीत होते. मात्र आता बदललेल्या बाजार परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू लागला आहे. बांगलादेशने कांद्याची आयात वाढवली असून श्रीलंका आणि दक्षिण भारतातूनही मागणी वाढली आहे.
त्यातच जुन्या कांद्याचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. लांबलेल्या पावसाचा परिणाम नवीन कांद्याच्या उत्पादनावर झाला असून उत्पादन घटले आहे. शिवाय उपलब्ध नवीन कांदा आकाराने लहान असल्याने दर्जेदार कांद्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कांद्याच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.
सध्या बाजारात नाशिक व पुणे जिल्ह्यांतून प्रामुख्याने जुन्या कांद्याची आवक होत असून नवीन कांद्याची आवक अत्यल्प आहे. दररोज सुमारे 120 ते 150 गाड्यांची आवक होत असून मालाला चांगला उठाव आणि समाधानकारक दर मिळत आहे.
मागील आठ महिन्यांपासून कांद्याचे दर दबावात होते. मात्र ख्रिसमस (25 डिसेंबर), नववर्ष स्वागत (31 डिसेंबर) आणि पर्यटन हंगामामुळे हॉटेल व्यावसायिकांकडून मागणी वाढत आहे. त्यामुळे पुढील कालावधीत कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार असल्याचे कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोटलानी यांनी सांगितले.