अडीच रुपयांची मदत? शेतकऱ्यांची थट्टा थांबवा!” केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान संतापले, अधिकाऱ्यांना झापाझाप आदेश
एपीएमसी न्यूज नेटवर्क:महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना सरकार आणि विमा कंपन्यांकडून मदतीची अपेक्षा असताना, पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील सिल्लोत्तर गावातील एका शेतकऱ्याच्या खात्यात केवळ 2 रुपये 30 पैसे पीकविमा मदत म्हणून जमा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावर तब्बल 11 एकर शेती असूनही त्यांना फक्त अडीच रुपयांची नुकसानभरपाई मिळाल्याचा मेसेज त्यांच्या मोबाईलवर आला. केवळ तेच नव्हे, तर देशातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात 1, 2, 5 ते 21 रुपये इतकी रक्कम जमा झाल्याचे प्रकार उघड झाले आहेत.
या प्रकरणाची माहिती मिळताच केंद्रीय कृषी, कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान संतापले. त्यांनी आज प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी थेट व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.
बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावत म्हटलं,
“शेतकऱ्यांना 1, 2, 5 किंवा 21 रुपयांचा विमा क्लेम देणं ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. हे अजिबात सहन केलं जाणार नाही!”
चौहान यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले असून, विमा कंपन्यांना तातडीने सर्व पात्र शेतकऱ्यांना योग्य रकमेची भरपाई एकाच वेळी देण्याचे निर्देश दिले. तसेच प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंमलबजावणीत आवश्यक सुधारणा करण्याचे आदेशही दिले.
शिवराज सिंह चौहान म्हणाले,
“ही योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक आपत्तीच्या काळातील वरदान आहे. मात्र अशा घटना घडल्यामुळे योजनेची बदनामी होते आणि विरोधकांना प्रोपेगेंडा बनवण्याची संधी मिळते.”
शेतकऱ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी आणि विमा योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी केंद्र सरकार आता सज्ज झाल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.