पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात; राज्य सहकारी बँकेकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 कोटींचे योगदान
.jpeg)
एपीएमसी न्यूज नेटवर्क: 
राज्यातील अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी राज्य सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. बँकेच्या ११४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केल्याप्रमाणे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दहा कोटी रुपयांचा धनादेश मंगळवारी (ता. ३०) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला.
नागपूर जिल्हा बँकेच्या प्रशासकपदाच्या कार्यकाळात राज्य बँकेने ठरवलेल्या १५५ कोटींच्या उद्दिष्टापैकी १५४ कोटी रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना वितरित केले होते. त्याचबरोबर सामाजिक उत्तरदायित्वाच्या भूमिकेतून १० कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे वळवून नैतिक कर्तव्य पार पाडल्याची माहिती राज्य बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली.
सहकारी बँकांना कंपनी कायद्यानुसार सीएसआर निधी मिळत नसला, तरी रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार गतवर्षीच्या निव्वळ नफ्याच्या १ टक्के निधी सामाजिक कार्यासाठी वापरण्याची तरतूद आहे. मात्र मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ही मर्यादा २ टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात राज्य सहकारी बँकेला ६५१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, त्यानुसार आरबीआयच्या परवानगीनुसार कमाल मर्यादेत म्हणजेच १० कोटी रुपयांचे योगदान देण्यात आल्याचे अनास्कर यांनी स्पष्ट केले.