Turmeric Market: बाजारात हळदीच्या भावात आणखी वाढ होईल का?
Turmeric Market Update : देशातील बाजारात हळदीला आधार देणारे काही घटक सक्रीय आहेत. देशात हळदीची उपब्धता कमी आहे. त्यातच यंदाची लागवड २० टक्क्यांपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे. तर हळदीची मागणी कायम राहण्याचा अंदाज आहे. यामुळे पुढील काळातही हळदीचे भाव तेजीत राहू शकतात, हा अंदाज गृहीत धरून व्यापारी आणि काही शेतकरी हळदीचा माल मागे ठेवत आहेत. यामुळे हळदीच्या दरात मोठी तेजी आली आहे. वायद्यांमधील तेजी जास्त आहे.
बाजार समित्यांमध्येही हळदीची आवक कमी आहे. बाजारातील आवक सरासरीपेक्षा जळपास ३० टक्क्यांनी कमी आहे. तर बाजारात हळदीला उठाव चांगला आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये हळदीच्या दरात वाढ झाली. एप्रिल २०२३ पासून बाजार समित्यांमधील दरात जवळपास ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसते. पुढील काळात देशातील बाजारात सणांमुळे हळदीला आणखी मागणी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी देशातील हळदीचा पुरवठा आणि मागणी यातील तफावत वाढण्याचा अंदाज आहे.
देशात सणांच्या काळात हळदीला मागणी वाढते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातूनही मागणी वाढण्याची शक्यता आहे. भारतातून हळदीची निर्यात मागील काही महिन्यांपासून वाढली आहे. मसाले बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार देशातून एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये हळदीची निर्यात २७ टक्क्यांनी वाढली. निर्यात वाढली पण दिसरीकडे बाजारातील पुरवठा कमीच राहीला. यामुळे हळदीच्या दराला आधार मिळाला. वाढलेल्या दरातही निर्यातीला मागणी येत असल्याचे निर्यातदरांनी सांगितले.
देशातील महत्वाच्या बाजारांमधील हळदीची आवक कमी आहे. त्यातच मागणी चांगली असल्याचा आधार बाजाराला मिळत आहे. देशात यंदा हळदीची लागवडही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हळदीच्या बाजाराला मजबूती मिळाली. बाजारातील आवकही सरासरीपेक्षा ५५ टक्क्यांनी कमी असल्याचं व्यापारी सांगत आहेत. तर स्टाॅकमधील मालही कमी झाला. त्यामुळे हळदीच्या तेजीला आधार मिळत आहे.
चालू हंगामात महाराष्ट्रात १० ते २० टक्क्यांनी लागवड कमी राहण्याचा अंदाज आहे. तर तमिळनाडूतील लागवड १० ते १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लागवडही १८ ते २२ टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे.
तर मागील तीन आठवड्यांमध्ये वेगवेगळ्या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकाला फटकाही बसला. देशात मागील हंगामात १३ लाख ३० हजार टन हळद उत्पादन झाले होते. तर यंदा उत्पादनात १८ टक्क्यांपर्यंत घट होण्याचा अंदाज आहे.