Wheat Production In India : यंदा गव्हाचे उत्पादन वाढणार शेतकरी FCI ला गहू विकणार?
 
Wheat MSP News : यंदाच्या हंगामात देशात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन वाढण्याचा अंदाज अन्न मंत्रालयालयाने (FCI) व्यक्त केला आहे. आजपर्यंतच्या उत्पादनात यंदा देशात गव्हाचे सर्वाधिक ११४ दशलक्ष टन उत्पादन होण्याचा अंदाज एफसीआयला आहे. गतवर्षी अर्थातच २०२२-२३ मध्ये गव्हाचे विक्रमी उत्पादन ११०.५५ दशलक्ष टन होते. यंदा सरकारने गव्हाची आधारभूत किंमत २ हजार २७५ रुपये निश्चित केली आहे. तर मागील वर्षी ही किंमत २ हजार १२५ रुपये होती.
काही भागात गव्हाच्या पेरणीचा शेवटचा टप्पा सुरु आहे, तो पुढील आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहे. अधिकृत आकडेवारीनुसार गेल्या आठवड्यापर्यंत ३२०.५४ लाख हेक्टरमध्ये गव्हाची लागवड झाली आहे. यामुळे यंदा गव्हाचे उत्पादन वाढून ते जवळपास ११४ दशलक्ष टनापर्यंत जाईल, अशी माहिती भारतीय अन्न महामंडळ (FCI) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अशोक के मीना यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
गहू लागवडीत वाढ
यंदा गव्हाच्या पेरणी क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत वाढ दिसून आली आहे. तर काही भागात ही वाढ एक ते दोन टक्के दिसून येत आहे. यामुळे यंदा उत्पादनाची ही पातळी वाढेल अशी आम्हाला आशा आहे. आम्ही आमच्या गरजेपेक्षा जास्त खरेदी करू शकतो. यामुळे पुढील वर्षासाठी खुल्या बाजार विक्री योजनेसाठी (OMSS) अतिरिक्त साठा देखील मिळू शकतो, असंही ते म्हणाले.
आधारभूत किंमतीत वाढ झाल्याने शेतकरी FCI ला गहू देतील
मागील वर्षाच्या असणाऱ्या गव्हाच्या आधारभूत किंमतीत यंदा ७ टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे यंदा आशा आहे की जास्तीत जास्त शेतकरी त्याचा गहू एफसीआयला देतील. तसंच गेल्या वर्षी FCI ची गहू खरेदी २६.३ दशलक्ष टन होती. जी वार्षिक १८.४ दशलक्ष टनांच्या बफर गरजेपेक्षा जास्त होती.
दरम्यान, FCI ही केंद्रीय नोडल एजन्सी आहे जी शेतकऱ्यांचा गहू आधारभूत किंमतीनुसार खरेदी करते. त्यानंतर तो गहू रेशन दुकानांद्वारे ८० कोटी पेक्षा जास्त सर्वसामान्य नागरिकांना विमामूल्य पोहचवला जातो.