लाल मिरचीच्या दरात मोठी वाढ होणार? तर शेवग्याची शेंग 400 रुपयांवर
-नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीला प्रतवारीनुसार 2000 पासून 5000 पर्यंत दर मिळत आहे. तर सुकलेल्या लाल मिरचीला 6000 पासून ते 12000 रुपयांपर्यंतचा दर आहे.
नंदुरबार: राज्यातील सर्वात मोठा मिरची उत्पादक जिल्हा म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड लाख क्विंटल लाल मिरचीची खरेदी झाली होती. मात्र यावर्षी हा आकडा अवघा 35000 क्विंटल आहे. यावर्षी जास्त पाऊस आणि विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव यामुळे मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली असल्याने मिरचीची आवक कमी झाली आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या जेवणामध्ये असणाऱ्या चटणीचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यावर्षी झालेला जास्त पाऊस आणि मिरचीवर आलेल्या विषाणूजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात 50 टक्के पेक्षा अधिक घट आली आहे. यावर्षी लाल मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट येणार असल्याचा अंदाज बाजार समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. लाल मिरचीच्या उत्पादनात घट येणार असल्याने येणाऱ्या काळात लाल मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे.
नंदुरबार बाजार समितीमध्ये ओल्या लाल मिरचीला प्रतवारीनुसार 2000 पासून 5000 पर्यंत दर मिळत आहे. तर सुकलेल्या लाल मिरचीला 6000 पासून ते 12000 रुपयांपर्यंतचा दर आहे. येणाऱ्या काळात मिरचीचे उत्पादन कमी असल्याने मिरचीचे दर वाढण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. यावर्षी लाल मिरचीच्या दरात वाढ होण्याची शक्यता असून गेल्यावर्षीच्या तुलनेत अवघी 30 टक्के मिरचीची खरेदी विक्री झाली आहे.
शेवग्याची शेंग 400 रुपये किलो दुसरीकडे लसणानंतर आता शेवग्याच्या शेंगांचे दरही गगनाला भिडले आहेत. शेवग्याची शेंगेचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत. मुंबईत शेवग्याची शेंगेचे दर 100 रुपये किलोवरुन थेट 400 रुपयांच्या घरात गेले आहेत.