160 कोटी टॅक्स चोरीचा आरोप, अबू आझमी यांना इनकम टॅक्स विभागाची नोटीस, अडचणी वाढणार?
मुंबई : राज्य आणि देशातील अनेक विरोधी पक्षातील नेत्यांना आतापर्यंत इनकम टॅक्स, ईडी आणि सीबीआयच्या चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. विशेष म्हणजे काही दिग्गज नेत्यांना जेलमध्ये जावं लागल्याचा प्रकार देखील समोर आला आहे. असं असताना आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. अबू आजमी (Abu Azmi) यांना आयकर विभाग अर्थात आयटीने चौकशीसाठी समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. आयकर विभागाच्या समन्सची बातमी ही फक्त अबू आजमी यांच्यापर्यंत मर्यादित नाही. तर महाराष्ट्रातील समाजवादी पक्षासाठी हा मोठा हादरा मानला जातोय. आयटीने दिलेल्या समन्सनुसार अबू आझमी यांना येत्या 20 एप्रिलला चौकसीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाराणसीतील विनायक ग्रुपमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशीचं समन्स बजावण्यात आलं आहे.
इनकम टॅक्स विभागाच्या वारणसी शाखेने 160 कोटींच्या टॅक्स चोरी आरोपांच्या प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. या प्रकरणात अबू आझमी यांच्यावर अतिशय गंभीर आरोप आहेत. अबू आझमी यांनी गेल्या काही वर्षांमध्ये वाराणसीपासून ते मुंबईपर्यंत हवालाच्या माध्यमातून 40 कोटी रुपये प्राप्त केले आहेत, असा गंभीर आरोप अबू आझमी यांच्यावर आहे.
नेमकं प्रकरण काय?
इनकम टॅक्स विभाग खरंतर वारणसी येथील विनायक ग्रुपची चौकशी करत होतं. या चौकशीदरम्यान या प्रकरणात अबू आझमी यांचं नाव समोर आलं. विनायक ग्रुपने वाराणसीमध्ये अनेक इमारती, शॉपिंग सेंटर आणि मॉल तयार केले आहेत.
इनकम टॅक्सच्या तपासात माहिती समोर आली की, विनायक ग्रुपमध्ये सर्वेश अग्रवाल, समीर दोषी आणि आभा गुप्ता हे पार्टनर आहेत. आभा गुप्ता या गणेश गुप्ता यांच्या पत्नी आहेत. तर गणेश गुप्ता हे अबू आझमी यांचे निकटवर्तीय होते. गणेश गुप्ता यांचं निधन होण्यापूर्वी ते समाजवादी पक्षाचे महाराष्ट्रातील महासचिव होते. ते मुंबईच्या कुलाबा परिसरातील आझमी यांच्या इमारतीतून आपलं कार्यालयीन कामकाज चालवायचे.