अजित पवार यांनी मौन सोडलं, जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर मोठं वक्तव्य
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची आयएल अँड एफएस प्रकरणी ईडीकडून काल जवळपास साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. जयंत पाटील यांच्या ईडी (ED) चौकशीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही प्रतिक्रिया दिली नसल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं. पण या चर्चांनंतर अजित पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवर प्रतिक्रिया दिली.
आम्ही सातत्याने याबद्दल सांगितलं आहे की, वेगवेगळ्या केंद्रीय आणि राज्य स्तरावरच्या ज्या योजना असतात त्यांना वेगवेगळ्या नागरिकांची चौकशी करण्याचा अधिकार असतो. त्यांना बोलवल्यानंतर ते पूर्णपणे सहकार्य करतात. अशाप्रकारे आपण पाहतो. जयंत पाटील यांना काल रात्री साडेनऊ वाजता सोडल्यानंतर त्यांनी जे स्टेटमेंट केलं ते आपण सगळ्यांनी पाहिलं आहे”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
“तुम्ही सर्वांनी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना दाखवण्याचं काम केलं. आता याबद्दल दबक्या आवाजात अनेकदा वेगवेगळे मान्यवर वेगवेगळ्या भूमिका मांडतात. आपलं मुंबईचं अधिवेशन चालू असताना पुरवणी मागण्यांच्या वेळेस वरच्या सभागृहात सत्ताधारी पक्षांनी काय सांगितलं ते आपण सर्वांनी बघितलं. ते सगळं रेकॉर्डमध्ये आहे”, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
“काँग्रेसमध्ये अनेक वर्ष मंत्रिपद उपभोगली लोकं देखील भाजपात गेल्यानंतर त्यांनी स्वत: कार्यक्रमात सांगितलं की, आता आम्ही इकडे आलेलो आहोत. आम्हाला काही त्रास नाही. आम्हाला झोप येतेय. आम्ही बिंदास आहोत. साताऱ्यातही एका खासदाराने तीच गोष्ट सांगितलं आहे. स्वत: केद्रीय राज्यमंत्र्यांनी देखील स्टेटमेंट केलं आहे की, आम्ही निरमामध्ये घालतो. स्वच्छ करतो, अशा प्रकारचं वक्तव्य केलं”, असं अजित पवारांनी सांगितलं.
सत्ताधारी पक्षाचे लोकं एकीकडे असं स्टेटमेंट करतात की चौकशीला बोलावल्यानंतर घाबरुन जाण्याचं काही काम नाही. यूपीए सरकार काळात कुणाला कसं बोलवलं होतं ते सांगितलं होतं. द्वेष भावनेतून राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करु नये. त्यांना काही क्लू मिळाला तर त्यांना तपास करण्याचा अधिकार आहे”, असं मोठं वक्तव्य अजित पवार यांनी केलं.
‘जयंत पाटील यांना काही एकट्यानाच चौकशीसाठी बोलावलेलं नाही’
“जयंत पाटील यांना काही एकट्यानाच चौकशीसाठी बोलावलेलं नाही. याआधी छगन भुजबळ यांनाही बोलावलं आहे. त्यावेळी मी स्टेटमेंट दिलं? अनिल देशमुख, प्रफुल्ल पटेल यांना बोलावलं होतं. त्यावेळी मी काही स्टेटमेंट दिलं असेल तर दाखवा. तुम्ही जाणीवपूर्वक असा काहीतर अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. मी कुणाबद्दल कुठलंही स्टेटमेंट करत नाही. माझ्याही घरामध्ये इनकम टॅक्सने धाडी टाकल्या होत्या. त्यावेळेस मी काय स्टेटमेंट करायचं ते केलं होतं”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.