अजित पवार शिंदे-फडणवीसांच्या भेटीला, सह्याद्री अतिथिगृहावर खलबतं, नेमकी चर्चा कशावर?
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर गंभीर दावा केला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागल्यानंतर निकाल ठाकरे गटाच्या बाजूने लागला तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर ईडीचा वापर करुन राष्ट्रवादीच्या 15 आमदारांसह सरकार स्थापन करायचं, असा भाजपचा प्लॅन बी असल्याचा धक्कादायक दावा अंजली दमानिया यांनी केलाय. विशेष म्हणजे अजित पवार गेल्या आठवड्यात अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले आणि पित्ताचा त्रास असल्याने कार्यक्रम रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं.
ईव्हीएम, पंतप्रधान मोदींची डिग्री आणि आणखी काही मुद्द्यांवर अजित पवारांनी मविआच्या विरोधात भूमिका मांडली. त्यामुळे महाविकास आघाडीत नेमकं काय सुरुय? असा प्रश्न उपस्थित होतोय. या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात काल बैठक झाली. या बैठकीत मविआत योग्य समन्वय साधण्यावर चर्चा झाली. तसेच मविआची एकी कमी होणार नाही यासाठी काळजी घेण्याचं एकमत झाल्याची माहिती समोर आलीय. या सगळ्या घडामोडी घडल्यानंतर आज सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात खलबतं झाल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार यांनी शिंदे-फडणवीसांची भेट का घेतली?
राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अनेक ठिकाणी पीकं उद्ध्वस्त झाली आहेत. शेतकऱ्यांना सरकारकडे मदतीची आशा आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: शेताच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी देखील केलीय. असं असताना आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला आमदार बच्चू कडू देखील उपस्थित होते.