Alert ! छत्र्या काढून ठेवा… येत्या 5 दिवसात महाराष्ट्रासह देशभरात जोरदार पाऊस कुठे कुठे लावणार हजेरी?
मुंबई : महाराष्ट्रासह देशातील विविध भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावासाचा हा सिलसिला अजूनही कायम राहणार आहे. येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील काही भागांसह देशभरात जोरदार पाऊस पडणार आहे. पावसाचा काहीच नेम नसल्याने आता छत्र्या काढून ठेवा. नाही तर पाऊस तुम्हाला भिजवल्याशिवाय राहणार नाही. येत्या 21 आणि 22 एप्रिल रोजी उत्तर भारतात जोरदार पाऊस होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या काही भागात उन्हाच्या प्रचंड झळा बसत आहेत. काही ठिकाणी उन्हाचा पारा 40च्या पुढे गेला आहे. तर राज्याच्या काही भागात अवकाळी पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पिकांचं नुकसान झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजपासून ते 4 मेपर्यंत देशभरात जोरदार पाऊस होणार आहे. खासकरून उत्तर भारताकडे सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या भागात जोरदार
मध्यप्रदेश, महाराष्ट्रातील विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे. विजांच्या कडकडाटासह या भागात पाऊस पडणार आहे. तसेच वादळीवाऱ्यांची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात काही ठिकाणी गारपिटींची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. आंध्रप्रदेश, तेलंगना, कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि केरळमध्ये येत्या ५ दिवसात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
घरे आणि भिंतींना धोका
हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रासह देशातील काही राज्यात जोरदार पाऊस होणार आहे. वादळी पाऊस, विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असून वीज कोसळण्याच्या घटनाही घडणार आहेत. वादळी पावसामुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. या अवकाळी पावसामुळे कच्ची घरे, भिंती आणि झोपड्यांचं नुकसान होण्याची शक्यताही वर्तवण्यातआळी आहे.
अमरावतीत वादळी पाऊस
अमरावती जिल्ह्यात पुन्हा वादळी वारा, अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा बसला आहे. जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील संत्रा बागांना गारपिटीचा तडाखा बसला आहे. वादळी वाऱ्यामूळे आणि गारपीटमुळे आंबिया बहारातील संत्रा गळाला आहे. पावसामुळे आंबा, कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
बीडमध्ये विजांचा कडकडाट
बीडमध्ये विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. तासभर झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय. त्यामुळे उकाड्याने हैराण असणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळालाय. बीड, वडवणी, गेवराई यासह इतर तालुक्यात अवकाळी पाऊस बरसत आहे. एकीकडे शहरातील नागरिकांना पावसाने दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरणारा आहे.
नांदेडमध्ये हळद पिकाला धोका
नांदेड जिल्ह्यातील नायगांव, कंधारसह काही भागात आज सकाळीही अवकाळी पावसाने जोर धरला. आज सकाळी या भागात कुठे मध्यम तर कुठे हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळला. काल जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या गारपिटीसह पावसाने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. त्यातच आताही पाऊस सुरूच असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलीय. विशेषतः हळद उत्पादक शेतकऱ्यांचे यात मोठे नुकसान होतंय.
बुलढाण्याला झोडपले
बुलढाणा जिल्ह्यात परवा वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. मात्र गारपीट आणि वादळी वारा थांबल्यावर झालेल्या नुकसानीचा भयाण वास्तव सांगणारा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ बुलढाणा ते मोताळा रस्त्यावरील असून वादळी वारा आणि गारपीट थांबल्या नंतरचा हा व्हिडिओ आहे. एक चारचाकी वाहन रस्त्याने जात असताना त्यातून घेतलेला हा व्हिडिओ असून या व्हिडिओमधून किती नुकसान झालेय हे कळते.