Apmc Election । राष्ट्रवादीला धक्का! देवरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा.
मुंबई: मागील सात वर्षापासून राष्ट्रवादीकडे असणारी देवरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नामनिर्देशन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी व काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली असून, भाजपचे 18 संचालक निवडून आल्याने   कृषी उत्पन्न बाजार समिती मधून NCP चा संपूर्ण सफाया झाला. भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 18 संचालकासाठी निवडणूक होणार होती. याकरिता भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ने कंबर कसली होती. आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त संचालक निवडून यावे याकरिता सर्वांनी रणनीती आखली होती. बाजार समितीया निवडणुकीकरिता विविध गटातून एकूण 59 उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. यात छाननी मध्ये २ व अपील मध्ये २ असे एकूण चार उमेदवारांचे नामांकन बाद झाले होते. एकूण 55 नामांकन वैद्य ठरले होते. यापैकी 37 उमेदवारांनी काल आपले नामांकन परत घेतले. व अठरा भाजपच्या उमेदवारांचे नामांकन वैध ठरले व यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ही बिनविरोध झाली. यामध्ये भाजपचे निवडून आलेले सेवा सहकारी संस्था गटाचे सुखचंद राऊत, प्रमोद संगिडवार, यादवराव पंचमवार, श्रीकृष्ण हूकरे, कमल येरणे, बबलू डोये, आसाराम पालीवाल, महिला राखीव गटातून गोमती तितराम, देवकी मरई इतर मागासवर्ग प्रवर्गातून गणेश भेलावे, भटक्या विमुक्त जमाती मधून द्वारका धर्मगुडे ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण गटातून अनिल बिसेन, शिवदर्शन भेंडारकर अनुसूचित जाती जमाती गटातून धनराज कोरोंडे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक गटातून विजय कश्यप व्यापारी व अडत्या गटातून दीपक अग्रवाल व अंशुल अग्रवाल, हमाल व तोलारी गटातून मारुती खंडारे हे बिनविरोध निवडून आले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याकरिता भाजपने विशेष रणनीती आखली होती.काँग्रेसच्या संचालकाचा भाजपमध्ये प्रवेश कृषी उत्पन्न बाजार समिती देवरीच्या निवडणुकीमध्ये नामांकन परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी इतर मागासवर्ग प्रवर्ग गटातून निवडून आलेले काँग्रेसचे गणेश भिलावे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला तर, भटक्या विमुक्त जमाती मधून निवडून आलेले चिचगड चे काँग्रेसचे कार्यकर्ते द्वारका धरमगुडे व हमाल तोलारी गटातून निवडून आलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मारुती खंडारे यांनी भाजपला पाठिंबा दर्शविला. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक बिनविरोध झाल्याने व भाजपच्या हातात एक हाती सत्ता आल्याने भाजपने फटाके फोडून व मिठाईवाटून आज जल्लोष साजरा केला.