Apmc Election Result 2023 : बाजार कुणाचा उठला?शिंदे गट की ठाकरे गटाचा ?बाजार समितीतील निकाल काय सांगतो ?
 
नवी मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल जाहीर होत आहेत. 147 बाजार समित्याच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यापैकी 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर भाजप-शिवसेना युतीला अत्यंत कमी जागा मिळाल्या आहेत. सत्तेत असूनही भाजप-शिवसेना युतीला अत्यंत कमी जागा मिळाल्याने युतीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचा कौल कुणाच्या दिशेने आहे हे स्पष्ट होत आहे.
147 जागांपैकी 72 जागांचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक 41 जागा मिळाल्या आहेत. तर भाजप आणि शिंदे गटाला फक्त 24 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे युतीसाठी हा मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे. महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी भाजप हा सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरला आहे. भाजपला आतापर्यंत 20 जागा मिळाल्या आहेत. तर शिंदे गटाला अवघ्या चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. राष्ट्रवादीला 17, काँग्रेसला 18 आणि ठाकरे गटाला अवघ्या सहा जागा मिळाल्या आहेत. या निवडणुकीत इतरांना सात जागा मिळाल्या आहेत.
गुलाल आणि जल्लोष
या निवडणुकीचे निकाल लागताच विजयी उमदेवाराच्या समर्थकांनी गुलाल उधळत आणि एकमेकांना पेढे भरवत एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेरच उमेदवाराला खांद्यावर घेऊन नाचत, गुलाल उधळत जोरदार जल्लोष केला. यावेळी ढोल ताशांच्या तालावंर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. तर कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांचा प्रत्येक मतदान केंद्रावर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
नाशिकमध्ये राडा
दरम्यान, विजयाचा जल्लोष सुरू असतानाच नाशिकमध्ये पिंपळगाव बाजार समितीच्या मतमोजणी दरम्यान तुफान राडा झाला. अपक्ष उमेदवार यतीन कदम आणि माजी आमदार अनिल कदम हे समोरासमोर आल्याने समर्थक यांच्यात राडा झाला. त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर समर्थक पांगले. मात्र या परिसरात अजूनही तणावाचे वातावरण आहे.
रामटेकमध्ये धक्कादायक निकाल
नागपूर जिल्ह्यातील तीनही बाजार समितीचे निकाल हाती आले आहेत. पारशिवणी आणि मांढळ बाजार समितीमध्ये सर्व जागांवर काँग्रेस समर्थक उमेदवार निवड निवडून आले आहेत, मात्र रामटेकमध्ये काँग्रेस आमदार सुनील केदार आणि शिंदे गटाचे आमदार आशिष जयस्वाल यांच्या गटाचा पराभव झालाय. या ठिकाणी काँग्रेसचा बंडखोर गट असलेल्या शेतकरी सहकार पॅनलचे 14 उमेदवार निवडून आले आहेत, तर भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आणि काँग्रेसचे गज्जू यादव यांच्या शेतकरी विकास सहकारी पॅनलचे चार उमेदवार निवडून आले आहेत. रामटेक मध्ये नेते हरले आणि कार्यकर्ते जिंकले असं चित्र आहे.