मुंबई APMC भाजीपाला मार्केट बनला गुटखा माफियांचा अड्डा ,पोलिसांच्या कारवाईत २ जण अटक

-अन्न-औषध प्रशासन व एपीएमसी पोलीस यांच्या संयुक्त कारवाई कारवाई
-APMC सचिव, सुरक्षा अधिकारी व गुटखा माफिया संगनमताने धंदा सुरूच?
नवी मुंबई :
मुंबई APMC भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये बुधवारी अक्षरशः क्राइम सीन पहायला मिळाला. बाजार आवारातील पानटपऱ्यांवर खुलेआम गुटखा व विविध नशिले पदार्थांची विक्री सुरू असल्याचे उघड झाले. यावर अन्न-औषध प्रशासन आणि एपीएमसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काही प्रमाणात गुटखा जप्त केला असून, दोन जणांना   अटक करण्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
यापूर्वीही या टपऱ्यांवर छापे टाकून सील करण्यात आले होते, मात्र कोर्टात अपूर्ण माहिती दिल्यामुळे काही दिवसांतच टपऱ्या पुन्हा सुरू झाल्या. परिणामी गुटखा माफियांचा धंदा पुन्हा जोमाने सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.
बाजार आवारात तब्बल १३० पानटपऱ्या असून त्यापैकी जवळपास १०० टपऱ्यांवर सर्रास गुटखा विक्री सुरू असल्याचे समजते. या टपऱ्यांवर तरुण वर्ग विक्री करतो आणि पाणी-बिस्कीट विक्रीच्या आडून गुटखा सहज उपलब्ध करून दिला जातो.
विशेष म्हणजे, बाजारात गुटखा, गांजा व दारू विक्रीसाठी दर महिन्याला लाखो रुपयांची देणगी घेतली जाते. हे पैसे कोणाकडे जातात याची माहिती सचिवांना असूनही ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे.
बाजार समितीचे सुरक्षा अधिकारी , सचिव आणि अन्न-औषध प्रशासन विभागातील काही अधिकारी यांच्याच संगनमताने हा धंदा सुरू असल्याची चर्चा आहे. एपीएमसी पोलिस आणि अन्न औषध प्रशासन वारंवार पत्रव्यवहार करूनही सचिवांनी दुर्लक्ष केल्याचे माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त योगेश धाणे यांनी सांगितले आहेत.
भाजीपाला मार्केट परिसरात जवळपास ५ हजार कामगार अवैधपणे वास्तव्य करतात. हेच कामगार बाजारातील गुटखा विक्रीचे मुख्य केंद्र असल्याचे स्पष्ट होत आहे. परिणामी, “नशामुक्त बाजार समिती”चे प्रयत्न अपयशी ठरत आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून बाजार आवारात गुटखा, गांजा आणि दारू विक्री उघडपणे सुरू आहे. कारवाई झाल्यानंतरही टपऱ्या पुन्हा सुरू होतात, कारण सचिव खंडागले यांना या धंद्यातून “मलिदा” मिळत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पानटपऱ्यांचे वाटप रद्द होत नाही.
एका पानटपऱ्याचे भाडे २० ते ३० हजार रुपये घेतले जात असताना एपीएमसी प्रशासनाला मिळतोय   फक्त १,५०० रुपये महसूल . त्यामुळे प्रशासनच या बेकायदेशीर व्यवसायाला संरक्षण देत असल्याचे आरोप होत आहेत.
बाजारघाटकांचे म्हणणे आहे की, या धंद्याला आळा घालण्यासाठी पोलिस व अन्न-औषध प्रशासनाने नियमित पेट्रोलिंग करणे अत्यावश्यक आहे. तसेच, टपऱ्यांचे मालक कोण आहेत याची खरी नोंद घेऊन कडक कारवाई करण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून होत आहे.
“एपीएमसी परिसरात गुटखा व अमली पदार्थांविरोधात नियमित कारवाई सुरू आहे. सध्या सणासुदीच्या काळात अन्न व औषध प्रशासनासोबत मिळून विशेष मोहीम राबवली जात असून, बाजार घटकांनीही यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.”
--- अजय शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एपीएमसी पोलीस ठाणे
“बुधवारी झालेल्या कारवाईची आम्ही दखल घेतली असून, प्रशासकीय पातळीवर आवश्यक उपाययोजना केल्या जातील. गुटखा व अमलीपदार्थ बाजार आवारात शिरकाव करू नये यासाठी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिले जाईल.”
--- विकास रसाळ, प्रशासक, मुंबई एपीएमसी