मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पाठ फिरताच पुन्हा अवकाळीचा फटका; ‘इथे’ पडला मुसळधार पाऊस
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नुकसानग्रस्त भागातील पाहणी दौरा नुकताच पार पडला आहे. यामध्ये एकनाथ शिंदे हे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या आजूबाजूला गराडा घालत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, लवकरात लवकर मदत करेल असे आश्वासन दिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला होता. नाशिकच्या सटाणा तालुक्यातील करंजाडीसह निताने, अभोना, बिजोटे आणि आखतवाडेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केली होती. यामध्ये लवकरात लवकर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा करून पाठ फिरत नाही तोच पुन्हा अवकाळी पाऊस पडला आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात पुन्हा शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
नाशिकच्या सटाणा तालुक्यासह, कळवण, मालेगाव, इगतपुरी, निफाड, दिंडोरी, देवळा या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. या भागातील शेतातील पिके अक्षरशः भुईसपाट झाले आहे. वादळी वाऱ्यासह असणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांचे अधिकचे नुकसान झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात सध्या कांदा पीक काढणीला आले होते. काहींनी काढून शेतात गंजी करून ठेवले होते. संपूर्ण पीकाचाच चिखल झाला आहे. त्यातच बाजार समितीतही कांद्याची परिस्थिती बघता कवडीमोल भावाने कांदा विकावा लागत आहे. त्यात आता पुन्हा कांद्याला पाणी लागल्याने खराब होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
एकूणच कांदा हे पीक यंदाच्या वर्षी मोठ्या प्रमाणात खराब होणार आहे. शेतकऱ्याला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. त्यातील महत्वाची बाब म्हणजे कांद्याची साठवणही करता येणार नाहीये. चाळीत कांदा मोठ्या प्रमाणात खराब होण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर दुसरी पिकेही खराब होण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे आता झालेल्या नुकसाणीचा पंचनामा करून सरकार काय मदत करणार याकडे शेतकरी आस लावून बसलेला असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले आणि पाहणी करत शेतकऱ्यांना आश्वासन दिले. त्यानंतर मदतीची प्रतिक्षा सुरू झाल्यानंतर काहीसा शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता.
मात्र, हा दिलासा फार काळ टिकला नाही. काही तासांमध्ये जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये कांदा, डाळिंब, द्राक्ष बाग, गहू यांसारखे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा त्रास सहन करावा लागत आहे.