मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन
नवी मुंबई : आता तिरुपती बालाजी मंदीरच दर्शन घेण्यासाठी आंध्रप्रदेशात जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील जनतेला आता नवी मुंबईतच तिरुपती बालाजीचं दर्शन घेता येणार आहे. नवी मुंबईतल्या उलवेनोडमध्ये तिरुपती बालाजीचं भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज सकाळी सकाळीच प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, नवी मुंबईतील आमदार, खासदार आणि स्थानिक नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे 6.45 वाजता उलवेनोड येथील प्रति तिरुपती बालाजी मंदिराचं भूमिपूजन केलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तिरुपती तिरुमला संस्थानचे मिलिंद नार्वेकरही उपस्थित होते. विधीवत पूजा अर्चा करत या मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाली होती. विशेष म्हणजे भल्या पहाटे या मंदिराचं भूमिजपून करण्यात आलेलं असतानाही मोठी गर्दी होती. स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. तिरुपती तिरुमाला बालाजी संस्थानच्या वतीने हे मंदिर उभारण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकार असतानाच या मंदिराच्या उभारणीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार आज भूमिपूजन सोहळा पार पडला.
500 कोटींची जागा
तिरुपती बालाजी मंदिराच्या धर्तीवर नवी मुंबईत श्री व्यंकटेश मंदिराची उभारणी करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील उलवे नोडमध्ये हे मंदिर उभारलं जात आहे. देशभरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती नवी मुंबईत उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारच्या सहकार्यानं नवी मुंबईतील उलवे नोड येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आली आहे. राज्य सरकारनं 500 कोटी रुपयांची 10 एकर जागा नवी मुंबईत बालाजी मंदिर उभारण्यासाठी दिली आहे. त्यामुळे हा मार्ग मोकळा झाला आहे.
70 कोटींची प्रतिकृती
नवी मुंबईत तिरुपती तिरुमाला संस्थानच्या वतीनं मंदिर उभारलं जाणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौतम सिंघानिया, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. तिरुपती तिरुमाला मंदिराच्या व्यवस्थापन नवी मुंबईत मंदिराची प्रतिकृती उभारण्यासाठी 70 कोटी रुपये खर्च करणार आहे. या रकमेची उभारणी दात्यांकडून आणि भक्तांकडून आलेल्या देणगीतून करण्यात येणार आहे.