BIG BREAKING | शरद पवार अॅक्शन मोडमध्ये , दोन दिग्गज नेत्यांविरोधात केली सर्वात मोठी कारवाई
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. शरद पवार यांनी या दोन्ही बड्या नेत्यांना थेट पक्षातून बडतर्फ केलं आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत शरद पवार यांनी ही मोठी कारवाई केली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडाला पाठिंबा दिल्याने त्यांच्या विरोधात ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या काही आमदारांना बडतर्फ केले आहे. यामध्ये शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे, विजय देशमुख यांचा समावेश आहे. जयंत पाटील यांनी याबाबतचं पत्र संबंधित नेत्यांना पाठवलं आहे. जयंत पाटील यांची याबाबतचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे.
जयंत पाटील यांनी पत्रात नेमकं काय म्हटलं आहे?
“महाराष्ट्राच्या राज्याच्या विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या व उपमुख्यमंत्री/मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी २ जुलै २०२३ रोजी शिवाजीराव गर्जे, नरेंद्र राणे, विजय देशमुख हे नेते उपस्थित राहिले. हे त्यांचे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे. त्यामुळे त्यांना पक्षाच्या सदस्यत्वावरून आणि पक्षाच्या विविध पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे”, असं जयंत पाटील यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.
शरद पवार अॅक्शन मोडमध्ये
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याचं चित्र आहे. अनेक आमदार सध्या तरी अजित पवार यांच्या बाजूने आहेत. तर काही आमदार आपल्याला फोन करुन तुमच्यासोबत आहोत, असं सांगत असल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे. तसेच अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही, असं शरद पवार स्पष्ट म्हणाले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादीत घडलेल्या घडामोडींचा सामना करण्यासाठी शरद पवार सक्षमपणे सामोरं जाण्यास तयार आहेत.