मोठी बातमी ! संजय राऊत यांची देवेंद्र फडणवीस यांना डीलची ऑफर - काय आहे डील?
मुंबई : संजय राऊत यांचा भोंगा पहाटे पहाटे वाजत असतो. ते आपल्याला घाबरतात म्हणून रोज यांची टीका सुरू असते, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीस यांच्या या टीकेचा संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. तसेच त्यांनी फडणवीस यांच्यासमोर एका डीलची ऑफर दिली आहे. मी तुमच्या घरासमोर येऊन प्रतिक्रिया देतो. त्यानंतर तुम्हीही त्यावर उत्तर द्या. नाही तर तुमची कारस्थानं थांबवा. मी सकाळी सकाळी बोलण्याचं बंद करतो. आहे का डील मंजूर? अशी ऑफरच संजय राऊत यांनी फडणवीस यांना दिली. त्यामुळे आता फडणवीस काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही ऑफर दिली आहे. तुमच्या सागर बंगल्यावर मी 9 वाजता पीसी घेईल. तुम्ही साडेनऊला बोला. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. माझ्या पक्षाचा मी प्रवक्ता आहे. सामनाचा कार्यकारी संपादक आहे. मी खासदार आहे. माझ्या पक्षाची बाजू मांडण्याचा मला अधिकार आहे. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडली तर तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? याचा अर्थ ते आम्हाला घाबरत आहेत. शिवसेना कागदावर तोडली असेल. निवडणूक आोयगाच्या माध्यमातून तुम्ही कुणाला शिवसेना दिली असली तरी खरी शिवसेना इथे आहे. जमीनीवर आहे. आमच्यात आहे. तुम्ही आमच्याशी सामना करू शकत नाही, असं संजय राऊत म्हणाले.