मुंबई पोलिसांना मोठं यश, दाऊदच्या इशाऱ्यावर नाचणारा जेरबंद, तपासात मोठी माहिती उघड
मुंबई : ड्रग्ज तस्कर कैलास राजपूतचा हस्तक अली अजगर सिराझी याला आज तिसऱ्यांदा मुंबईच्या किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याला 19 जून पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासात सिराझी याचे गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील या अंडरवर्ल्ड गँगस्टरसोबत संबध दिसून आल्याने टेरर फंडिंगचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास एनआयए मार्फत केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मुंबई पोलीस खंडणी विरोधी पथकाने अली अजगर सिराझी याला 22 मे ला अटक केली होती. तो भारताबाहेर पळून जात असताना त्याला मुंबई विमानतळावरुन अटक करण्यात आली. तपासात त्याच्याकडे 15 किलो केटामाईन हे ड्रग्स सापडलं. त्याची किंमत तब्बल 8 कोटी रुपये आहे. कैलास राजपूत हा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया आहे. त्याची मोठी टोळी आहे. कैलास नंतर अली अजगर सिराझी हा गँग चालवित होता. कैलास हा सध्या आयर्लंडच्या जेलमध्ये आहे. त्यामुळे सिराझी हा सध्या ही गँग चालवित होता.
अली अजगर सिराझीच्यी कुरियरच्या तीन कंपन्या
मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सिराझी याची सखोल चौकशी केली. त्याच्या कुरियरच्या तीन कंपन्या आहेत. त्याचप्रमाणे त्याने या व्यवसायातून खूप पैसा कमावला आहे.तो पैसा त्याने इतर व्यवसायात लावला आहे. त्याचा सर्व व्यवहार त्याचा सीए निकेश भावसार हा बघायचा. भावसार याची देखील चौकशी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अली सिराझी याच्या ज्या तीन कंपन्या आहेत त्यात त्याची पत्नीही भागीदार आहे. त्याच्या पत्नीचाही तस्करीत संबध आहे का? याचाही पोलिसांनी तपास केला.
दाऊद इब्राहिमच्या इशाऱ्यावरून काम
महत्वाच म्हणजे अली याची गँग दाऊद इब्राहिम याच्या इशाऱ्यावरून काम करत असल्याने आणि या व्यवसायातून मिळणारा पैसा हा दाऊदला जात असल्याने, हाच पैसा पुढे दहशतवादी कारवायासाठी वापरला जात असल्याचं तपासात उघड झाले आहे. टेरर फंडिंग लिंक असल्याचं दिसून आल्याने या गुन्ह्या प्रकरणी आता एनआयए तपास करण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप सिराझी याचा ताबा घेण्यासाठी इतर कुठली तपास यंत्रणा समोर आलेली नाही.
अली अजगर सिराझीच्या वतीने वकील तारक सैय्यद यांच्या लीगल टीम मार्फत वकील अब्रार शेख यांनी कोर्टात सिराझीला टॉवेल सोबतच इतर आवश्यक वस्तू देण्यासाठी अर्ज केला. ती मागणी कोर्टाने मान्य करत सिराजीला तुरुंगात टॉवेल, पजामा, कोलगेट आणि इतर काही वस्तू पुरविण्याची मंजुरी देण्यात आली आहे.