BREAKING | ‘शाहरुख खान याच्याकडे 25 कोटींच्या खंडणीची मागणी, 50 लाख स्वीकारले’, सीबीआयचे गंभीर आरोप, 29 ठिकाणी छापेमारी
मुंबई : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्ट समीर वानखडे (Sameer Wankhede) यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करण्यात आले आहेत. समीर वानखेडे यांनी मुंबई एनसीबी झोनलचे डायरेक्टर असताना कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकली होती. या धाडीत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यन खान आणि त्याच्या इतर मित्रांकडे ड्रग्ज आढळल्याचा आरोप करण्यात आलेला. हे प्रकरण प्रचंड तापलेलं. आता याच प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे.
समीर वानखेडे यांनी शाहरुख खानकडे आर्यनची जेलमधून सुटका करण्यासाठी तब्बल 25 कोटींची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. वानखेडे यांच्यासोबत एनसीबीच्या आणखी दोन अधिकाऱ्यांवर आरोप करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणी सीबीआयचे गंभीर आरोप आहेत.
सीबीआयच्या आरोपांनुसार, समीर वानखेडे यांनी 50 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा दावा केला जातोय. त्यामुळी सीबीआयकडून समीर वानखेडे यांच्यासह इतर आरोपींविरोधात कारवाई सुरु आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह इतर आरोपींच्या 29 ठिकाणी छापेमारी केल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे यांच्या प्रकरणात सीबीआयने 5 जणांना आरोपी बनवलं आहे. समीर वानखेडे यांच्यासहीत आणखी दोन शासकीय अधिकारी यामध्ये आरोपी आहेत. तर दोन खाजगी इसमांचा समावेश आहे. सीबीआयने आज या प्रकरणात 29 ठिकाणी छापेमारी केलीय. मुंबई, दिल्ली यासह 29 ठिकाणी छापेमारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
नेमकं प्रकरण काय?
समीर वानखेडे यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक टीम तैनात करण्यात आली होती. ही टीम सविस्तर तपास करत होती. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं क्रूझ ड्रग्स प्रकरण, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावायाचं प्रकरण आणि आणखी असे काही प्रकरणं होती. त्या प्रकरणांप्रकरणी टीमकडून चौकशी करण्यात आली. या टीमने समीर वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता.
संबंधित अहवालाच्या आधारे सीबीआयने प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरात छापेमारी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयचं एक पथक समीर वानखेडे यांच्या मुंबईतील घरी झाडाझडती घेण्यासाठी दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. सीबीआयच्या अधिकाऱ्यांकडून छाननी केली जातेय.
या कारवाईमुळे समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. सीबीआयने जो गुन्हा दाखल केलाय त्या अनुषंगाने वेगळी काही कारवाई केली जाते का ते पाहणं देखील महत्त्त्वाचं ठरणार आहे. मात्र, सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केलाय. त्याच गुन्ह्याच्या अनुषंगाने ही कारवाई केली जात आहे.
समीर वानखेडेच्या नेतृत्वाखाली NCB टीमने 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई बंदराजवळ एका क्रूजवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यावेळी बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. आर्यन खान तीन आठवडे तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मागच्यावर्षी मे महिन्यात NCB ने आर्यन खानसह सहाजणांवरील ड्रग्स बाळगल्याचे आरोप हटवले होते.
समीर वानखेडे यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीमधून एनसीबीच्या एका टीमने तपास आपल्या हाती घेतला. वानखेडेंची बदली केली. या प्रकरणाशी संबंधित एक रिपोर्ट्ही समोर आला होता. त्यात आर्यन खानला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं, असं म्हटलं होतं. एनसीबीच्या तपासात काही त्रुटी होत्या. पुरेसे पुरावे नसताना, तपास पुढे सुरु ठेवला. पाच डझन लोकांची जबानी नोंदवण्यात आली.