एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतली अमित शाह यांची भेट - 5 मुद्द्यांवर झाली चर्चा
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल नवी दिल्लीला गेले होते. या दोन्ही नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील एकूण पाच मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं सांगितलं जातं. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट झाली होती. या भेटीत काय चर्चा झाली. याची माहितीही शिंदे यांनी शाह यांना दिल्याचं वृत्त आहे. शिंदे यांनी पवार यांच्या भेटीचा तपशील शाह यांना दिल्यानंतर शाह यांनी त्यांना काय उत्तर दिलं, हे गुलदस्त्यात आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर गेले होते. दोन्ही नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेऊन त्यांच्याशी राज्यातील कॅबिनेट विस्तारावर चर्चा केली. विस्तारात महिलांना संधी देण्यावरही या बैठकीत चर्चा झाली. महिलांच्या सन्मान ही राज्याची पहिला प्राथमिकता असली पाहिजे, असं बैठकीत ठरल्यांचही सांगितलं जात आहे. तसेच बैठकीत युवा नेत्यांना कॅबिनेटमध्ये संधी देण्यावर चर्चा झाल्याचीही सांगितलं जात आहे. घरी किंवा बंगल्यावर बसून नाही तर फिल्डवर ऊतरून काम करणारे नेते कॅबिनेटमध्ये घ्यायला हवेत, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी शाह यांच्याकडे व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे.
त्यांना बाजूला ठेवणार
तसेच शिवीगाळ करणाऱ्या आणि आक्षेपाहार्य वर्तन करणाऱ्या नेत्यांनाही मंत्रिमंडळातून दूर ठेवण्यात येणार आहे. महायुतीवर 50 खोके, एकदम ओकेचा डाग लागला आहे. त्याला कामाच्या माध्यमातून उत्तर देण्यावरही चर्चा झाली आहे. राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिक जास्त परिश्रम करण्याचा सल्ला अमित शाह यांनी या दोन्ही नेत्यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.
पवारांशी भेट
या भेटीत महाराष्ट्रातील अनेक प्रकल्पांवर केंद्र सरकारचं मार्गदर्शन आणि सहाकार्यावर चर्चा करण्यात आली. तसेच गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची वर्षा बंगल्यावर भेट झाली होती. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांची पहिल्यांदाच पवारांशी भेट झाली. या भेटीत काय चर्चा झाली याची माहिती शिंदे यांनी अमित शाह यांना दिली. मात्र, त्यावर अमित शाह यांनी काय प्रतिक्रिया दिली हे समजू शकले नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
निवडणुकांवर चर्चा
दरम्यान, या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील निवडणुकांबाबतही चर्चा केल्याचं सांगितलं जात आहे. मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. लोकांमध्येही निवडणुकांबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. त्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.