Eknath Shinde on SC Verdict : सत्ता संघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया काय?
मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यावर काही निरीक्षणं नोंदवली. हा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी दिलासा देणारा आहे. या निकालावर प्रतिक्रिया देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सत्ता संघर्षावरील निकालावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अपेक्षित लागला. अखेर सत्याचा विजय झाला. न्यायालयाने दिलेला निकाल पाहिला. बेकायदेशीर आणि तांत्रिक बाबींचा उल्लेख करण्यात आला. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. देशात राज्यघटना, नियम आहे. त्याच्या बाहेर कुणालाही जाता येणार नाही. सरकार स्थापन केलं ते कायदेशीर चौकटीत बसूनचं. बहुमताचे सरकार स्थापन झालं. त्यावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
मेरिटप्रमाणे अपेक्षित निकाल
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, घटनाबाह्य सरकार म्हणत होते. न्यायालयाने घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना चपराक दिली आहे. त्यांना कालबाह्य केलं आहे. न्यायालयाच्या या आम्ही निर्णयाचे स्वागत करतो. आमची भूमिका हीच होती. मेरीटप्रमाणे अपेक्षित असा निकाल न्यायालयाने दिला. १६ आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले. निवडणूक आयोगाला अधिकार होता. त्यामुळे शिवसेना पक्ष म्हणून आम्हाला त्यांनी मान्यता दिली.
म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला
विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेचे अधिकार आहेत. राजकीय पक्षाबाबतही कोर्टानं भाष्य केलं. तीन महिन्यानंतर आयोगानं आम्ही शिवसेना आणि धनुष्यबाण आहोत असा निकाल दिला होता. राजकीय पक्षदेखील आम्हीचं आहोत. अध्यक्ष मेरीटवर निर्णय घेतील. माजी मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिला. कारण त्यांच्याकडे बहुमत नाही. हे त्यांना माहीत होतं, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं.
नैतिकता कुणी जपली?
राज्यात परिस्थिती निर्माण झाली तेव्हा त्यावेळचं सरकार अल्पमतात आलं. शेवटी सरकारचा गाडा चालला पाहिजे. कायदेशीर, घटनात्मक बाबींची काळजी घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. माजी मुख्यमंत्री यांना राजीनामा देण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. शिवसेना-भाजप युतीला बहुमत दिलं होतं. लोकांना अपेक्षित असलेला निर्णय घेतला. भाजप-शिवसेना म्हणून निवडणूक लढवली. तेव्हा आम्ही सत्तेत होतो. नैतिकता कुणी जपली हे सांगण्याची आवश्यकता नाही, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला.