सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? इच्छुकांनी सांगितली तारीख
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी 30 जूनला सरकारची सूत्र हाती घेतली होती. त्यांनी पदाची सूत्र घेतल्यानंतर मंत्रिमंडळ पहिला विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) तब्बल 39 दिवसांनी झाला होता. त्यानंतर अनेक दिवस खातेवाटपही झाले नव्हते. खातेवाटप झाल्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध लागले होते. कारण मंत्रिमंडळात २८ जागा रिक्त आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात असणाऱ्या याचिकेमुळे विस्तार रखडला असल्याचे बोलले जात होते. आता गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय दिलेआहे. त्यात शिंदे सरकारला दिलासा मिळाला. यामुळे पुन्हा इच्छुकांना विस्ताराचे वेध लागले आहे.
कधी होणार विस्तार
मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले होते. आता हा विस्तार कधी होणार? याची तारीख प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सांगितली आहे. बच्चू कडू म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारात काही अडचण नाही. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार झाला पाहिजे. या विस्तारात माझी वर्णी कधी लागणार की नाही, हे सांगता येत नाही. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला दिलेला शब्द होता. ते आपला शब्द पाळतील, हे निश्चित आहे. २१ ते २६ मेपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार होऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.राज्यात काम व्हायचं असेल आणि जिल्ह्याला न्याय द्यायचा असेल तर मंत्रिमंडळ विस्ताराची गरज आहे, असेही ते म्हणाले.
निकालामुळे जनता खूश
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे जनता खूश आहे. आता विस्तार झाला पाहिजे. कुणालाही मंत्री करा पण विस्तार करा. आतापर्यंत भीती होती की न्यायालयाच्या निकालाशिवाय मंत्रिमंडळाचा विस्तार होणे शक्य नाही. आता मंत्रिमंडळ विस्ताराची ही अडचण दूर झालेली आहे.
२८ जागा रिक्त
एकनाथ शिंदे यांच्यासोबत सर्व मिळून 50 आमदार आल्याने प्रत्येकालाच महत्त्वाकांक्षा, मंत्रीपदाची अपेक्षा होती. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात मात्र अनेकांचा अपेक्षाभंग झाला. काहींनी जाहीर नाराजीही व्यक्त केली. यात संजय शिरसाट तसेच बच्चू कडू यांचाही समावेश आहे. आता २८ जागा रिक्त आहेत. परंतु त्यातील १२ जागा शिंदे गटाला तर १६ जागा भाजपकडे जाणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटात इच्छुकांनी संख्या जास्त असल्याने कोणाला संधी द्यावी? हा प्रश्न आहे.