महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असताना राहुल नार्वेकर यांच्याबद्दल महत्त्वाची बातमी
मुंबई : सुप्रीम कोर्टातील महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालाकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. येत्या 11 तारखेला सुप्रीम कोर्टाचा निकाल जाहीर होऊ शकतो, अशी चर्चा आहे. पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सत्तासंघर्षाच्या निकालाची सुनावणी ज्या खंडपीठाकडे होती त्यापैकी एक न्यायमूर्ती लवकरच निवृत्त होणार आहेत. त्यामुळे येत्या 11 तारखेला किंवा पुढच्या पाच दिवसांत निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता असल्याचं मानलं जात आहे. असं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. या निकालात विधानसभा अध्यक्षांची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे. पण असं असताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्यापासून 15 मे पर्यंत लंडनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. राहुल नार्वेकर 9 मे ते 15 मे पर्यंत लंडनच्या दौऱ्यावर असतील.
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल नार्वेकर एका खासगी संस्थेच्या कार्यक्रमासाठी लंडनला जात आहेत. याशिवाय त्यांची राष्ट्रकूल मंडळासोबत एक महत्त्वाची बैठक आहे. या बैठकीसाठी ते लंडनला रवाना होत आहेत. ते लंडनला जाऊन राष्ट्रकूल मंडळाच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करणार आहेत. ते राष्ट्रकूल मंडळाचे शिबीर मुंबईत करण्यासाठी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राहुल नार्वेकर यांचा यआधी जपान दौरा
राहुल नार्वेकर गेल्या महिन्यात जपान दौऱ्यावर गेले होते. त्यांच्यासोबत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे देखील गेले होते. त्यावेळी अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे 40 आमदारांसह भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. त्यानंतर लगेच राहुल नार्वेकर जपान दौऱ्यावरुन मुंबईत दाखल झाले. त्यामुळे राहुल नार्वेकर जपनाचा दौरा अर्धवट सोडून परत आले, अशा चर्चा सुरु झाल्या. पण नार्वेकर यांनी आपण जपानमधील सर्व कामे करुन परतलो आहोत. पण दौरा अर्धवट सोडून आलो नाही, असं स्पष्टीकरण दिलं होतं.