कलिंगडाची आवक वाढली - प्रति दिन ७०० टनपेक्षा जास्त आवक; वाढली मागणी
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी मार्च ते मे दरम्यान सर्वाधिक आवक आंब्याची होत असते. पण यंदा चित्र उलटे असून आंब्यापेक्षा कलिंगडाची आवक जास्त होऊ लागली आहे. सोमवारी ४०० टन आंबा व ७२५ टन कलिंगडाची आवक झाली आहे. 
उन्हाळ्यात तीन ते चार महिने बाजार समितीमध्ये फळांचा राजा आंब्याचे राज्य सुरू असते. सर्व मार्केट आंबामय होऊन जाते. कोकणासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ, उत्तर प्रदेश व गुजरातवरून टप्प्याटप्प्याने आंब्याची आवक होत असते. या वर्षी मार्चमध्ये आवक मोठ्या प्रमाणात आवक झाली. पण एप्रिलमध्ये पीक कमी असल्यामुळे आंब्याची आवक स्थिरावली आहे. कडक उन्हाळा व रमजानच्या उपवासामुळे आंब्यापेक्षा कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमधून व राज्याच्या विविध भागांतून कलिंगडाची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. सोमवारी ७२५ टन आवक झाली असून, प्रतिदिन ७०० टन पेक्षा जास्त आवक होत आहे. होलसेल मार्केटमध्ये कलिंगड ८ ते १४ रुपये व किरकोळ मार्केटमध्ये २० ते २५ रुपये किलो दराने विकले जात आहे. उन्हाळ्याचा कडाका वाढल्यामुळे फळांना मोठी मागणी असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.