प्रशासकाच्या मनमानी कारभाराचा फटका: कल्याण APMC मध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद!

कल्याण | एपीएमसी न्यूज नेटवर्क : कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक डॉ. किशोर मांडे यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ बुधवारी एक दिवसाचा कडकडीत बंद पाळण्यात आला. भाजीपाला, फळे, फुले, धान्य यांचा संपूर्ण घाऊक व्यापार ठप्प पडल्याने परिसरातील किरकोळ बाजारावर जबरदस्त परिणाम झाला आहे.
दररोज सुमारे ७५० ट्रक भाजीपाला, फळे व फुले कल्याण बाजार समितीत दाखल होतात. मात्र बुधवारी व्यापाऱ्यांनी पुरवठा बंद ठेवत प्रशासनाविरोधात संतप्त भूमिका घेतली. कल्याण, डोंबिवली, मुरबाड, शहापूर, भिवंडी आदी भागांतील लहान विक्रेत्यांना ताज्या मालाअभावी शिळा भाजीपाला विक्री करावी लागली. दरातही मोठी उसळी दिसून आली. वडापाव विक्रेत्यांचे बटाट्याअभावी चक्के थांबले.
बंदामागील कारण म्हणजे, बाजार समितीच्या सुविधा भूखंडाचा वादग्रस्त भाडेपट्टा करार. ठाणे जिल्हा सहकारी संस्थेचे उपनिबंधक व प्रशासक डॉ. मांडे यांनी आदर्श आचारसंहिता लागू असताना व्यापारी संघटनांच्या विश्वासात न घेता पाच हजार चौरस मीटर भूखंड लक्ष्मी भाजी बाजार संघटनेला दहा वर्षासाठी भाड्याने दिला. यामुळे संभाव्य वाहतूक अडथळे व अनधिकृत बांधकामाचा धोका निर्माण झाला आहे, असा आरोप व्यापाऱ्यांचा आहे.
“सर्व व्यापारी संघटनांना विश्वासात घेतले असते, तर विरोध झाला नसता. नियमबाह्य कारभार प्रशासकाने थांबवावा,” अशी मागणी रवींद्र घोडविंदे (सभापती, कल्याण बाजार समिती) यांनी केली.
या बंदमध्ये कल्याण फळ विक्रेता संघटना, भाजीपाला घाऊक विक्रेते, फूल विक्रेते, कांदा-बटाटा व्यापारी संघटना व माथाडी कामगार संघटनांचा मोठा सहभाग होता.
लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात येण्यापूर्वी प्रशासकांनी एकतर्फी निर्णय घ्यावा, हे लोकशाहीला आणि व्यापारी हिताला धोका असल्याची भावना व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान, निवडणूक होऊनही प्रशासक कार्यभार सोपवायला तयार नसल्याने वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.