मराठा आंदोलनासाठी मुंबई एपीएमसीत राहण्याची व्यवस्था; मात्र NMMC व CIDCO कडून मदत नाही – समन्वयकांचा आरोप

नवी मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा समन्वयकांची नियोजन बैठक एपीएमसी प्रशासकीय इमारतीत पार पडली. या बैठकीत उपसभापती हुकूमचंद अमदारे, एपीएमसी सचिव डॉ. पी. एक. खंडागळे यांच्यासह मराठा समन्वयक सहभागी झाले होते.
बैठकीत शशिकांत शिंदे यांनी बाजार समिती प्रशासनाला, नवी मुंबईत दाखल होणाऱ्या मराठा बांधवांसाठी तात्पुरत्या राहण्याची सोय करण्याची मागणी केली. त्यावर प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील लवकरच आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. हा मोर्चा नवी मुंबईहून मुंबईकडे रवाना होणार आहे. त्यासाठी नवी मुंबईतील समन्वयकांनी एपीएमसी परिसरातील कांदा-बटाटा मार्केटमध्ये आंदोलकांसाठी निवास व्यवस्था केली आहे.
मात्र, या व्यवस्थेसाठी नवी मुंबई महानगरपालिका व सिडको प्रशासनाने कुठलीही मदत केली नाही, असा गंभीर आरोप मराठा समन्वयकांनी केला आहे. दरम्यान, मराठा आंदोलक नवी मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली असून आज रात्री किंवा पहाटे मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल होणार असल्याचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी सांगितले.