मुंबई APMC सचिवांचा ‘एक्शन मोड’ सुरू! CCTV नियंत्रण, मुख्यालयात प्रवेशद्वार नोंदणी आणि डिजिटलायझेशनकडे मोठे पाऊल
-मुंबई APMC मध्ये शिस्त, पारदर्शकता आणि जबाबदारीचा नवा अध्याय कडे वाटचाल.
-मुख्यालयात एकाच प्रवेशद्वारातून ये-जा प्रत्येक व्यक्तीची नोंद अनिवार्य अनधिकृत वावरावर आळा
-CCTV नियंत्रणावर प्रश्नचिन्ह!
मुख्यालयातील CCTV नियंत्रण कक्ष सचिव व सुरक्षा अधिकारी यांच्याकडे असावा, मात्र तो एका विशिष्ट अभियंत्याच्या दालनात कार्यरत असल्याने ती व्यवस्था तात्काळ बंद करण्याची जोरदार मागणी
-APMC होणार डिजिटल!
नवे सॉफ्टवेअर,   सेस वसुली आणि प्रत्येक मार्केटच्या उपसचिवांसह दैनंदिन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सचिवांचा थेट संवाद ,पारदर्शकतेकडे निर्णायक पाऊल
नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC) नवे सचिव शरद जरे यांनी पदभार स्वीकारताच प्रशासकीय शिस्त आणि पारदर्शकता यासाठी धडाकेबाज मोहिमेला प्रारंभ केला आहे. मुख्यालयातील अनागोंदी आणि अनधिकृत हालचालींवर आळा घालण्यासाठी त्यांनी अनेक ठोस उपाय सुरू केले आहेत.
सचिव जरे यांनी सर्वप्रथम मुख्यालयाच्या प्रवेशद्वारांचे नियंत्रण कडक केले आहे. आता एकाच प्रवेशद्वारातून ये-जा करता येणार असून, प्रत्येक व्यक्तीची नोंद प्रवेशद्वारावर खास रजिस्टरमध्ये केली जाणार आहे. संबंधित व्यक्ती कोणत्या विभागात जात आहे, याची माहिती आणि परत जाताना त्याची नोंद या दोन्ही प्रक्रिया बंधनकारक करण्यात आल्या आहेत.
यासोबतच, गेस्ट हाऊसमध्ये येणाऱ्या संचालक मंडळाच्या सोबत अनावश्यक वावर करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर वचक बसवण्याचे निर्देश सचिवांनी दिले आहेत. कार्यालयीन वेळेत फक्त कामाशी संबंधित अधिकारीच हजर राहतील, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.
CCTV नियंत्रणावरील मोठी हालचाल
महत्त्वाची बाब म्हणजे, बाजार समितीच्या मुख्यालयात सुरक्षा व्यवस्थेसाठी सुरक्षा अधिकारी व कर्मचारी नेमलेले आहेत. मुख्यालयातील CCTV प्रणालीची कमान नियमानुसार मुख्य सुरक्षा अधिकारी व सचिव यांच्या नियंत्रणाखाली असावी, मात्र सध्या एक कमान सचिवांकडे आणि दुसरी अभियांत्रिकी विभागातील एका अभियंत्याच्या दालनात असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या पाच वर्षांपासून या अभियंत्याच्या दालनात CCTV मॉनिटर व ऍक्सेस सुरू असून, त्यामुळे मुख्यालयात कोण येतो, कोण भेटतो आणि किती वेळ थांबतो, याची माहिती इतरांकडे पोहोचत असल्याची चर्चा सुरु आहे.या पार्श्वभूमीवर नवीन सचिव शरद जरे यांनी अभियंत्याच्या दालनातील CCTV मॉनिटरिंग सिस्टम बंद करून ती मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याकडे सोपवावी, अशी जोरदार मागणी कर्मचाऱ्यांकडून व बाजार घटकांकडून होत आहे.
-सचिव जरे यांच्या डिजिटलायझेशनचा संकल्प
सचिवांनी APMC ला डिजिटल बनवण्याचा संकल्प केला आहे. २५ वर्षांपूर्वीची जुनी DOS सॉफ्टवेअर प्रणाली हटवून आधुनिक सॉफ्टवेअर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच, फळ मार्केटमध्येही कांदा, बटाटा व भाजीपाला मार्केटप्रमाणे सेस वसुली सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. यामुळे समितीच्या उत्पन्नात कोट्यवधी रुपयांची वाढ होणार आहे आणि गेटवरील तक्रारीही कमी होतील.
-मार्केटनिहाय जबाबदारी व व्हिडिओ कॉन्फरन्सिंग
प्रत्येक मार्केटच्या उपसचिवांना आता स्वतंत्र अधिकार देण्यात येत असून, सचिव दररोज VC (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) द्वारे त्यांच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.