पूरग्रस्तांसाठी मुंबई APMC व्यापाऱ्यांचा मदतीचा हात; 44 लाखांची रक्कम मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

नवी मुंबई : राज्यातील अनेक भागांना आलेल्या पुरामुळे शेतकरी बांधवांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील (APMC) व्यापारी बांधव पुढे सरसावले आहेत. मंगळवारी (७ ऑक्टोबर) या व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तब्बल 44 लाख रुपयांचा धनादेश संच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते सुपूर्द केला.
या निधीमध्ये फळ बाजारातून २८ लाख रुपये, भाजीपाला बाजारातून ८ लाख १० हजार रुपये, अन्नधान्य बाजारातून ५ लाख रुपये, तर कांदा-बटाटा बाजारातून ३ लाख रुपये अशा स्वरूपात देणग्या गोळा करण्यात आल्या.
पूरग्रस्त शेतकरी बांधवांना या मदतीमुळे दिलासा मिळेल, असा विश्वास व्यापारी संघटनांनी व्यक्त केला आहे. यावेळी मुख्यमंत्री यांच्यासह मुंबई एपीएमसी धान्य मार्केट व्यापारी संघटनेचे (GROMA) अध्यक्ष भीमजी भाई भानुसाली, सचिव निलेश विरा, अमृतलाल जैन, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघाचे कैलास ताजने, फळ मार्केटचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, कांदा-बटाटा मार्केटचे   राजू मणियार, तसेच आमदार मंदा म्हात्रे आणि आमदार शरद सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.