मुंबई,नवी मुंबई ,ठाण्यात पावसाचा कहर! लोकल धीम्यागतीने , रस्ते जलमय-पोलिसांचा इशारा: काम नसेल तर घरीच थांबा!

मुंबई ,एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : मुंबई आणि उपनगरांमध्ये शुक्रवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे सेंट्रल, हार्बर आणि वेस्टर्न लोकल रेल्वे सेवा २० ते ३० मिनिटे उशिराने धावत असून अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.
हवामान विभागाने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात   पुढील २४ तासांसाठी “अतिमुसळधार पावसाचा” इशारा दिला आहे. परिणामी मुंबई पोलिसांनी नागरिकांना “अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका,” असा सल्ला दिला आहे.
अंधेरी, सायन, कुर्ला, माटुंगा जलमय:
शहरातील अंधेरी, सायन, कुर्ला, माटुंगा आदी निचऱ्या भागांमध्ये रस्ते आणि परिसर पूर्णतः पाण्याखाली गेले आहेत. सार्वजनिक वाहतूक ठप्प झाली असून, शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. समुद्राला भरती असल्याने किनाऱ्यांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.
राज्यभरात पावसाचा धडाका — कोकण, विदर्भात रेड अलर्ट!
मुंबईसह ठाणे, नवी मुंबई ,रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा आहे. दरम्यान, पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांतही हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. या भागांमध्ये अतिवृष्टीची शक्यता असून स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे.
नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांतही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहावे आणि आवश्यकतेशिवाय घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रशासन सज्ज, आपत्कालीन यंत्रणा कार्यरत
राज्य सरकारकडून सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभाग, महापालिका, पोलीस आणि अग्निशमन दल सतत संपर्कात असून मदतकार्य तत्काळ सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.