मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे, समृद्धीवरून जाणाऱ्या वाहनांसाठी मेगा अलर्ट, अन्यथा काळ्या यादीत जाल
मुंबई : मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून आणि समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. मालवाहू ट्रक, बसेस आणि इतर वाहनांवर आता मोठी कारवाई होणार आहे. या वाहनांनी हायवेवर लेन कटिंग केल्यास त्यांना महागात पडणार आहे. राज्याचे वाहतूक आयुक्त विवेक भिमनवार यांनी लेन कटिंग करणाऱ्या वाहनांना इशारा दिला आहे. लेन कटिंग करणाऱ्या आणि वाहनांच्या मार्गात अडथळा आणणाऱ्या मोठ्या आणि अवजड वाहनांना काळ्या यादित टाकलं जाईल, असं वाहतूक आयुक्तांनी रविवारी सांगितलं.
एक्स्प्रेस-वे आणि हायवेंवर अनेक ट्रक हे उजव्या बाजूनेच चालत असतात. यामुळे छोट्या वाहनांना पुढे जाण्यात अडथळे निर्माण होतात. पुढे जाण्यासाठी छोट्या वाहनांना डाव्या बाजूने ओव्हरटेक करावा लागतो किंवा दोन अवजड वाहनांमधून त्यांना मार्ग काढावा लागतो. अशा प्रकारांमुळे अलिकडच्या काळात अपघाताच्या भीषण घटना घडल्याचं समोर आलं आहे, असं भिमनवार म्हणाले.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे आणि समृद्धी महामार्गावर अशा प्रकारे वाहन चालवणाऱ्या ट्रक, बसेस आणि इतर अवजड वाहनांना काळ्या यादीत टाकण्याचं काम सुरू झालं आहे, असं भिमनवार यांनी पुढे सांगितलं. तसंच लेन कटिंग करणाऱ्या वाहनांना पकडण्यासाठी महामार्गावर बारीकाईने लक्ष ठेवण्याच्या आणि सतर्क राहण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असं ते पुढे म्हणाले. यासाठी महामार्गांवर मोक्याच्या ठिकाणी किमान १० इंटरसेप्टर वाहनं तैनात केली जात आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.