पीएम-किसानचा 20वा हप्ता! मोदींचं थेट प्रसारण मुंबई एपीएमसीत 150 शेतकरी, अधिकाऱ्यांची उपस्थिती

नवी मुंबई, एपीएमसी न्यूज़ नेटवर्क :   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा २०वा हप्ता देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) प्रणालीद्वारे पाठवण्यात आला. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण सकाळी ११ वाजता सर्व राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये एलसीडी स्क्रीनद्वारे करण्यात आले.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातही विशेष आयोजन करण्यात आले होते. शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी मिळून सुमारे १५० लोक या ठिकाणी एकत्र जमले होते. या ठिकाणी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे प्रतिनिधी डॉ. डी.एस. यादव स्वतः उपस्थित होते आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांना संबोधित करत योजनेच्या उद्दिष्टांबाबत माहिती दिली व सरकारच्या धोरणांची रूपरेषा स्पष्ट केली. शेतकऱ्यांना प्रत्येकी २,००० रुपये हप्त्याच्या स्वरूपात आर्थिक मदत देण्यात आली.
राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांच्याकडून राज्यातील सर्व बाजार समित्यांना आज सकाळी ११ ते १२ या वेळेत कमीत कमी २०० शेतकऱ्यांच्या उपस्थितीत थेट प्रक्षेपण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. यानुसार मुंबई एपीएमसीने प्रभावी आयोजन करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.
या उपक्रमामुळे पीएम-किसान सन्मान निधी योजनेविषयी अधिकाधिक शेतकऱ्यांना माहिती मिळाली असून, पुढील टप्प्यांमध्ये सहभाग वाढण्याची शक्यता आहे.
पीएम-किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन हप्त्यांमध्ये एकूण ६,००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे.