पितृपंधरवड्यात सात्विक भाज्यांची मागणी तुफानी; मर्यादित आवकेमुळे किरकोळ बाजारात दर दुप्पट-तिप्पट

नवी मुंबई :
पितृपंधरवडा सुरू होताच मुंबई एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात सात्विक भाज्यांना मोठी मागणी निर्माण झाली आहे. श्राद्धकर्मासाठी कांदा-लसूण टाळून शुद्ध सात्विक आहार घेतला जात असल्याने फ्लॉवर, गवार, भेंडी, कारले, लाल भोपळा, वाटाणा, कच्ची केळी व पालेभाज्यांच्या खरेदीत लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र, राज्यात पावसाच्या अडथळ्यांमुळे आवक मर्यादित राहिल्याने घाऊक आणि किरकोळ बाजारात दर झपाट्याने वाढले आहेत.
घाऊक बाजारातील सध्याचे दर (₹/किलो)
• फ्लॉवर : २०–३२
• वाटाणा : १२०–१५०
• गवार : ६०–९०
• भेंडी : ६०–८०
• कारले : ४५–६०
• लाल भोपळा : २०–३०
• फरसबी : ४०–५०
• घेवडा : ४०–५०
• केळी भाजी : २५–३०
• मेथी : २०–२५
• पालक : १०–१५
• कोथिंबीर : १०–१२
मेथी, पालक, कोथिंबीर यांसारख्या पालेभाज्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात या भाज्या दुप्पट ते तिप्पट दराने विकल्या जात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांची कोंडी झाली आहे.
घाऊक भाजीपाला व्यापारी श्यामराव मोहिते पाटील यांच्या म्हणण्यानुसार, अनेक शेतकऱ्यांचा भाजीपाला पावसामुळे बाजारात पोहोचलेलाच नाही. तसेच थेट ग्राहक विक्रीला प्राधान्य दिल्याने एपीएमसीत आवक मंदावली आहे. परिणामी भाववाढ थांबलेली नाही.
पितृपंधरवडा संपेपर्यंत सात्विक भाज्यांचा तुटवडा व भाववाढ कायम राहण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण कमी होऊन आवक वाढल्यासच बाजारभाव स्थिर होतील, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.