मुंबई APMC मध्ये धडाकेबाज फेरबदल! शरद जरे यांनी स्वीकारला सचिवपदाचा कार्यभार
-गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर खंडागळेंची हकालपट्टी पारदर्शकतेसाठी ओळखले जाणारे अधिकारी शरद जरे मुंबई APMC चे नवे सचिव
मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) मोठा फेरबदल करण्यात आला असून, डॉ. पी.एल. खंडागळे यांची सचिवपदावरून तडकाफडकी बदली करून राज्याच्या पणन विभागाने छत्रपती संभाजीनगर येथील सहकारी संस्थांचे सह-निबंधक शरद जरे यांची सचिव म्हणून नियुक्ती केली आहे.
शरद जरे यांनी गुरुवारी (ता. ३०) मुंबई APMC सचिवपदाचा कार्यभार औपचारिकपणे स्वीकारला. या वेळी बाजार समितीतील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
जरे यांच्या नियुक्तीची बातमी समोर आल्यानंतर बाजार समितीमध्ये मोठी खळबळ निर्माण झाली होती. काही अधिकारी आणि संचालकांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध करण्याचा प्रयत्न करत उपमुख्यमंत्री अजित पवारसह विविध नेत्यांकडे   संपर्क साधल्याची माहिती मिळते. मात्र, या प्रयत्नांना अखेर यश मिळाले नाही.
गेल्या काही महिन्यांपासून तत्कालीन सचिव डॉ. खंडागळे यांचे नाव बाजार समितीतील अनियमितता, संगनमत आणि गैरव्यवहारांच्या प्रकरणांशी जोडले जात होते. बाजार समितीतील प्रकल्प, पुनर्विकास, रस्ते आणि ड्रेनेज कामांमधील निकृष्ट दर्जा, फळ मार्केटमधील थेट फी वसुलीमुळे झालेली आर्थिक हानी आणि कोल्ड स्टोरेजमधील अनियमित कारभार या संदर्भात सतत तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. अखेर पणन विभागाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्णय घेत खंडागळे यांची बदली केली असल्याचे समजते.
नवे सचिव शरद जरे हे शिस्तप्रिय, कार्यक्षम आणि पारदर्शक कामकाजासाठी ओळखले जातात. त्यांच्या पुनरागमनामुळे बाजार समितीतील प्रामाणिक अधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे, तर काही जण सावध भूमिकेत दिसत आहेत.
राज्य शासनाने अलीकडेच प्रमुख बाजारपेठांना “राष्ट्रीय बाजार”चा दर्जा देण्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये मुंबई APMC अग्रस्थानी आहे. त्यामुळे या फेरबदलाला प्रशासनिक आणि धोरणात्मक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बाजार समितीतील घटकांच्या मते, “शरद जरे यांची नियुक्ती ही APMC च्या कारभारात पारदर्शकता आणि शिस्तीचा नवा अध्याय ठरू शकते.”