शरद पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, पण…, सूत्रांकडून सर्वात मोठी बातमी
मुंबई : शरद पवारच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहणार, अशी मोठी बातमी सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच पक्षाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची घोषणा केली. पण राष्ट्रवादी काँग्रसचे नेते अजित पवार वगळता सर्व नेत्यांनी शरद पवार यांच्या या निर्णयाला विरोध केला. राष्ट्रवादीचे अजित पवार वगळता जवळपास सर्वच नेत्यांनी शरद पवार यांच्या निर्णयाला विरोध केला. तर कार्यकर्त्यांनी भर सभागृहात शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा यासाठी ठिय्या मांडला. शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरातील राष्ट्रवादीचे आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून राजीनामे दिले जात आहेत. त्यामुळे शरद पवार हेच पक्षाच्या अध्यक्षपदी असणार असल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडे विचार करण्यासाठी दोन दिवसांचा वेळ मागितला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर बाहेर आंदोलनाला बसलेल्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी आज शरद पवार यांनी त्यांच्यासोबत बातचित केली. यावेळी तुमच्या मनासारखा निर्णय होईल. तुमच्या भावनांचा अनादर करणार नाही. तुम्हाला दोन दिवसांनी पुन्हा असं बसावं लागणार नाही, असं आश्वासन शरद पवार यांच्याकडून देण्यात आलं. त्यामुळे शरद पवार हेच अध्यक्ष असल्याचं निश्चित मानलं जात होतं. पण सूत्रांकडून या वृत्ताला दुजोरा मिळाला आहे.
पक्षात नेमके बदल काय होणार?
या सगळ्या घडामोडींनंतर आता आणखी एक महत्त्वाची बातमी सूत्रांकडून मिळत आहे. पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध पाहता शरद पवार हेच अध्यक्षपदी असणार आहेत. तर दैनंदिन कामकाजासाठी कार्याध्यक्ष बनवण्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
शरद पवार यांनी नव्या पक्षाध्यक्षाच्या निवडीसाठी एक कमिटीच नेमली आहे. या कमिटीची उद्या बैठक होणार आहे. या बैठकीत शरद पवार हेच येत्या लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत अध्यक्ष राहतील, असा प्रस्ताव मांडण्यात येईल. या प्रस्तावाला अनौपचारिकरित्या तत्वत: मान्यता मिळाली आहे. त्यामुळे शरद पवार हे अध्यक्ष असतील. तर कार्याध्यक्ष आणि तहहयात अध्यक्ष अध्यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दोन दिवसांपासून सुप्रिया सुळे आणि अजित पवार या दोन नावांची चर्चा आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाला सर्वाधिक पसंती असल्याची देखील चर्चा आहे. आगामी काळात सुप्रिया सुळे हे पक्षाच्या अध्यक्षा असाव्यात तर अजित पवार हे राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा असावा असं मत पक्षातील नेत्याचं असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. पण या चर्चा कितपत खऱ्या ठरतात ते आगामी काळात स्पष्ट होईल. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर उद्या संध्याकाळपर्यंत जवळपास चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.