मुंबई APMC त जेसीबीद्वारे पुष्पहार व फुलांची उधळण करून शशिकांत शिंदे यांचे जंगी स्वागत.

- मंत्र्यांच्या बेजबाबदार वागणुकीवर शशिकांत शिंदे यांचा घणाघात!
नवी मुंबई | एपीएमसी न्यूज नेटवर्क : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोष सुरू आहे. आज नवी मुंबईतील एपीएमसी प्रशासकीय इमारतीमध्ये अधिकारी व कर्मचारी संघटनेकडून जेसीबीद्वारे फुलांची उधळण करत त्यांच्या जंगी स्वागताचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमात   मार्केटमधील व्यापारी, माथाडी, सुरक्षा आणि वाहतूक कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
“राज्यात शेतकऱ्यांना हमीभाव नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, आणि विधान परिषदेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे मोबाईलवर ‘रम्मी’ खेळत बसतात! हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि मंत्री म्हणतात – ‘राजीनामा देणार नाही’! मग मुख्यमंत्री त्यांच्या पाठिशी का उभे राहतात?” – असाही संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या, मात्र काही मंत्र्यांमुळे सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याचेही स्पष्टपणे सांगितले.
“हनी ट्रॅपसारख्या संवेदनशील विषयांवर मौन, स्पष्टीकरण नको! पुरावे दाखवणाऱ्यांना अटक? हा कायदा आहे का धाकटपट्टीचा खेळ?” – असा सवाल शिंदे यांनी फडणवीस सरकारला विचारला.
“सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई झाली म्हणजे न्याय झाला, असं समजणं भोळेपणाचं ठरेल. जर मंत्री ‘राजीनामा देणार नाही’ अशा बिनधास्तपणे बोलतात, तर त्यांना कोण पाठिंबा देतोय? मुख्यमंत्री तरी का गप्प आहेत?”
शशिकांत शिंदे यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले असून, कायदा-सुव्यवस्थेवरील प्रश्न, मंत्र्यांचा बेजबाबदारपणा आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुन्हा नव्याने चर्चा रंगण्याची शक्यता आहे.