सर्वात मोठी बातमी ! ना सुप्रिया सुळे, ना अजित पवार, राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी या नेत्याची नियुक्ती - शरद पवार यांची घोषणा*
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा राजकीय वारसदार कोण? अशी चर्चा गेल्या महिन्यात रंगली होती. शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर या चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर शरद पवार अध्यक्ष आणि सुप्रिया सुळे कार्यकारी अध्यक्ष करावेत अशी चर्चाही सुरू झाली होती. मात्र, या सर्व चर्चांना पवारांनी पूर्णविराम दिला होता. त्यानंतर आज शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे या दोन नेत्यांची नियुक्ती केली आहे. अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीत अजित पवार साईड ट्रॅकवर गेले काय? अशी चर्चा रंगली आहे.
ष्ट्रवादी काँग्रेसचा 25 वा वर्धापन दिन आहे. त्या निमित्ताने दिल्लीत राष्ट्रवादीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. त्यानंतर शरद पवार यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या. शरद पवार यांच्या या घोषणा म्हणजे धक्कातंत्राचा भाग असल्याचं म्हटलं जात आहे. शरद पवार यांनी पक्षात भाकरी फिरवली आहे. पवार यांनी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. तर अजित पवार यांच्याकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सुप्रिया सुळेंकडील जबाबदारी काय?
शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याकडे अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदासह सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणाची जबाबदारीही सुप्रिया सुळे यांच्याकडे देण्यात आली आहे.
अजित पवारांकडे काहीच नाही
पवार यांनी सध्या अजित पवार यांच्याकडे काहीच जबाबदारी दिली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. अजित पवार यांना साईडलाईन केलंय का? अशी चर्चाही रंगली आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत आणि अजित पवार महाराष्ट्रात अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. मात्र, पवार यांनी सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करतानाच महाराष्ट्रातील निवडणुकांची जबाबदारीही त्यांच्याकडे दिली आहे. अजित पवार यांच्याकडे महाराष्ट्राच्या निवडणुकांची जबाबदारी दिलेली नाहीये. पवारांच्या या खेळीमुळे सर्वांनाच बुचकळ्यात टाकलं आहे.
पटेलांकडे पाच राज्यांची जबाबदारी
प्रफुल्ल पटेल यांना राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष करतानाच त्यांच्यावर पाच राज्यांची जबाबदारीही देण्यात आली आहे. पटेलांकडे गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
तटकरेंचं वजन वाढलं
खासदार सुनील तटकरे यांचं राष्ट्रवादीतील वजन वाढलं आहे. तटकरे यांची राष्ट्रीय सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.