ते हळूच ऑडी कारमधून उतरतात, आणि ‘त्या’ चौकात चहा विकतात, कारण…
मुंबई : मुंबईकर आणि चहा यांचे अतूट असे नाते आहे. दिवसातून कितीही वेळा चहा घेतला तरी मुंबईकरांना चहाची तलफ लागतेच लागते. रात्री, मध्यरात्री, अपरात्री चहा पिणारे शौकीनही येथे कमी नाहीत. कष्टकरी, कामकरी यांच्या विभागात असे चहाचे ठेले रात्रभर लागलेले असतात. तर, इथे पुण्याच्या अमृतुल्य धर्तीवर आता ब्रँडेड चहाचे चाहतेही काही कमी नाहीत. याच ब्रॅण्डच्या शृखंलेत आता एक नवीन ब्रॅण्डची भर पडलीय. दोन तरुणांनी हा आगळावेगळा ब्रँड नावारूपाला आणला आहे. ‘एमबीए चायवाला’ आणि ‘ग्रॅज्युएट चायवाला’ यांच्याप्रमाणेच आता ऑडी चायवाल्यांची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. मुंबईतील महागड्या आणि पॉश असा एरिया ओळखला जाणाऱ्या लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या बॅकरोडला दररोज या ब्रँडेड चहाचा स्टॉल लावला जातो.
सच कडवा है’ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या ‘ऑन ड्राइव्ह चहा’च्या प्रसिद्ध स्टॉलबद्दल पोस्ट करण्यात आली आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्याची एकच चर्चा सुरु झाली. ‘ऑन ड्राइव्ह चहा’ची एक गरम चाय की प्यालीचा आनंद घेण्यासाठी अनेक ग्राहक रांगेत उभे असतात असे या व्हिडिओत म्हटले आहे.
पोस्ट केलेल्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्याच्या कारच्या डिकीमधून चहा विकताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये सदर व्यक्ती साखर घालून चहा पेपर कपमध्ये ओतताना दिसत आहे. कॅमेरा झूम आउट करताच चहाच्या टपरीजवळ एक पांढरी ऑडी कार उभी केलेली दिसते. “मुंबई @ondrivetea लोखंडवाला बॅकरोड येथे रस्त्याच्या कडेला ऑडी कारमध्ये चहा विकत असलेला एक माणूस असे या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
अमित कश्यप आणि मन्नू शर्मा हे या ब्रँडेड चहाच्या कल्पनेमागील खरे सूत्रधार आहेत. हे दोघे तरुण आपल्या महागड्या अशा आलिशान ऑडीच्या डिक्कीमध्ये आपले चहा विक्रीचे सामना घेऊन येतात आणि लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या बॅकरोडला स्टॉल लावतात. या आपल्या ब्रॅण्डला त्यांनी ‘ऑन ड्राइव्ह चहा’ असे नाव दिले आहे आणि त्याची किंमतही त्यांनी प्रति कप २० रुपये इतकीच ठेवलीय.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याने अनेकांचे लक्ष वेधले. ‘मुंबईच्या मागच्या बाजूला लोखंडवाला येथे रस्त्याच्या कडेला ऑडी कारमध्ये चहा विकणारा एक माणूस आणि स्टॉलचे अधिकृत Instagram पेज @ondrivetea टॅग केले असून ‘थिंक लक्झरी, ड्रिंक लक्झरी’ अशी टॅगलाइनही त्याला देण्यात आलीय.
दरम्यान, ‘सच कडवा है’ या इंस्टा अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर झाल्यावर त्याखाली एका युजरने ‘”कोणताही व्यवसाय हा लहान व्यवसाय नसतो, कठोर परिश्रमांचा आदर करा. मी या माणसाला सलाम करतो,” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने या लोकांनी चहा विकल्यानंतर ऑडी विकत घेतली की ऑडी विकत घेण्यासाठी चहा विकावा लागला हे मला समजले नाही असे म्हटलंय.